नाशिक - नाशिकच्या पंचवटी परिसरातील अमरधाम परिसरात जादूटोण्याचे झाड दिसून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या ठिकाणी एका बाभळीच्या झाडाला असंख्य काळ्या बाहुल्या लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी या झाडाला मुक्त केले आहे.
झाडावर खिळ्यांच्या सहाय्याने ठोकण्यात आलेले समान हटवले
जादूटोण्याच्या नावाखाली अनेक बाबांकडून अंधश्रद्धा पसरवण्याचे प्रकार करण्यात येत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने उघडकीस आणण्यात आला आहे. पंचवटी परिसरातील अमरधाम परिसरात एका बाभळीच्या झाडाला मोठ्या संख्येने काळ्या बाहुल्या, नारळ, काळे कापड, लिंबू यासंह विविध प्रकारचे साहित्य लावण्यात आल्याचे दिसून आल्याने शहरभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सहाय्याने झाडावरील साहित्य हटवले आहे. तसेच हा सर्व प्रकार अंधश्रद्धेच्या माध्यमातून करण्यात आला असून कोणीही अंधश्रद्धेला बळी पडू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे.
कारवाईची मागणी
याआधीही असे अनेक प्रकार या परिसरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणले होते. अनेक ठिकाणी भोंदूबाबांच्या नादाला लागून काही जणांकडून असे प्रकार करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी अशाप्रकारचे खिळे ठोकल्यास कारवाई करण्यात येईल असे बोर्ड पोलिसांकडून लावण्यात यावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. दर अमावस्येला असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असतात. अशांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.