नाशिक - कोरोना काळात सर्व आरोग्य यंत्रणा व्यस्त असताना आदिवासी जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत बोगस डॉक्टरांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. मात्र, आता पुन्हा एकदा आरोग्य विभागाने सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात डिग्री नसलेल्या नाशिक जिल्ह्यातील 12 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागात ज्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा पोहचली नाही अशा ठिकाणी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. तात्पुरता दवाखाना सुरू करून रूग्णांना स्वस्तात उपचार करण्याचे आमिष दाखवले जात आहे. ताप, खोकला, सर्दीवर औषध दुकानात मिळणाऱ्या गोळ्या, औषधांचा वापर करून या डॉक्टरांकडून उपचार केले जात आहे. काही रोगाचे निदान होत नसल्याने अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
अशात आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून बोगस डॉक्टरांचा शोध घेतला जात आहे. बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तालुका पातळीवर समिती गठीत करण्यात आली असून, त्याचे प्रमुख तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. या समितीत गट विकास अधिकारी, तहसिलदार, गावातील सरपंच, आरोग्यसेविका, ग्रामसेवक यांचा समावेश आहे. याच मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील 12 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.
अशी केली जाते चौकशी - बोगस डॉक्टरांबाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाल्यास त्याची खातरजमा करण्यासाठी सदरची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविले जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांची खात्री झाल्यास संबंधित बोगस डॉक्टरला नोटीस देऊन त्यांच्याकडील वैद्यकीय पात्र कागदपत्रांची मागणी केली जाते. मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित डॉक्टरांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाते. बहुतांशी वेळा कायद्यात अशा डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी लागणारा कालावधी पाहता कारवाई पूर्वीच बोगस डॉक्टर पसार होऊन जाण्यात यशस्वी ठरतात.
कारवाईचे आदेश - नाशिक जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यास त्याची तात्काळ खात्री करण्यात येते. कोरोनामुळे मध्यंतरीच्या काळात कारवाई थांबलेली होती, मात्र आता पुन्हा एकदा बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडण्यात आली असून, त्यासंबंधीत सूचना तालुका पातळीवर देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर यांनी दिली.