नाशिक - जर्मनी येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर मेंटल मॅथ्स स्पर्धेत नाशिकच्या आर्यन शुक्ल याने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करताना वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी आर्यनने जागतिक स्तरावर अतिशय अवघड अशा स्पर्धेत विविध देशातील ६५ स्पर्धकांना मागे टाकत विजेतेपद मिळविले आहे. भारतातील नामांकित प्रशिक्षक युझेबियस नोरोन्हा (जिनियसकीड इंडिया संस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यनने या स्पर्धेत भाग घेतला होता.
जागतिक ज्युनिअर मेंटल मॅथ्स चॅम्पियनशिप ही दरवर्षी जर्मनी येथे भरविली जाते. यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली स्पर्धा "झूम" मिटिंगच्या माध्यमातून ऑनलाइन स्वरूपात आयोजित केली गेली होती. यावेळी १२ वर्षाखालील वयोगटात भारत, बल्गेरिया, युएई, दक्षिण आफ्रिका, सर्बिया, अल्जेरिया, बोस्नियासह एकूण ६५ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
यापूर्वी पात्रता फेरीत आर्यन शुक्ल "अ" गटातून खेळत होता. यावेळी एकूण १२ प्रश्न एकामागोमाग एक विचारले गेले ज्याचे उत्तर प्रत्येकी फक्त १५ सेकंदात द्यायचे होते. आर्यनने सर्व १२ प्रश्नाची अचूक उत्तरे देऊन ५० पैकी ५० गुण मिळवित अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला होता. अंतिम फेरीत एकूण १२ सर्वोत्तम स्पर्धकांनी स्थान मिळविले. अंतिम फेरीत प्रत्येकी १५ प्रश्न २५ सेकंद अशा स्वरूपात विचारले गेले. आर्यनने अतिशय कौशल्याने सर्व प्रश्नाची उत्तरे अचूक देत ७० पैकी ७० गुणांची कमाई करत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आणि विश्वविजेतेपद भारतासाठी खेचून आणले. अवघ्या काही सेकंदात विविध प्रकारचे अतिशय कठीण गणिताचे प्रश्न या स्पर्धेत विचारले गेले होते. ९ ते १२ आकडी संख्येचे घनमूळ, ५७२१४०९६चे वर्गमूळ, मोठ्या संख्येचे गुणाकार (७८६९X९२३७), मोठ्या संख्येचा भागाकार, बेरीज आणि वजाबाकी, अपूर्णांक प्रश्न (५/६+६/११) अशा अनेक प्रश्नाचा सामना स्पर्धकांना एकामागोमाग करणे गरजेचे होते.
जिनियस कीड येथे प्रमुख प्रशिक्षक युझेबियस नोरोन्हा तसेच नाशिकमधील नितीन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यन वयाच्या ६व्या वर्षांपासून मेंटल मॅथ्सचे प्रशिक्षण घेत आहे. २०१८मध्ये तुर्की येथे मेमोरियाड मेंटल मॅथ्स ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने ७ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्यपदक जिंकत दोन किड्स विश्वविक्रम केले आहेत. विशेष म्हणजे मागील महिन्यात लंडन येथे पार पडलेल्या मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२० या स्पर्धेत त्याने १७ वर्षाखालील ज्युनिअर गटात कांस्यपदक पटकावत स्पर्धेच्या २३ वर्षांच्या इतिहासात सर्वात लहान वयाचा पदकविजेता होण्याचा पराक्रम केला होता. जर्मनीमधील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर आर्यन हा एकमेव भारतीय आहे, ज्याने या दोन्ही स्पर्धेत पदकविजेता होण्याचा बहुमान मिळविला आहे.
हेही वाचा - अमली पदार्थांच्या संदर्भात बॉलिवूडच्या 'डी' नावाने सुरुवात असलेल्या अभिनेत्रीचे नाव आले समोर?