मनमाड (नाशिक) : लॉकडाऊनमुळे देशभरात अनेक ठिकाणी भाविक लोक अडकले होते. मनमाड येथील गुरुद्वारात देखील 105 भाविक गेल्या 45 दिवसांपासून अडकलेले होते. या भाविकांना आज (गुरुवार) त्यांच्या घरी (पंजाब) पाठवण्यात आले. गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंह यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाचा पाठपुरावा भुजबळ यांनी केल्यामुळे सर्व भाविकांची वैद्यकीय तपासणी होऊन, ते आज पंजाबला रवाना झाले.
हेही वाचा.... 'कठीण परिस्थितीचा सामना करून त्यावर विजय मिळवला पाहिजे, ही बुद्धांची शिकवण'
गुरुद्वारा प्रशासनाने पालकमंत्री छगन भुजबळ यांना भाविकांना पंजाब राज्यात परत जाऊ देण्याबाबत विनंती केली होती. भुजबळ यांनी याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पंजाब येथील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून येथे अडकलेल्या 105 भाविकांची यादी पाठवली. सर्व कागदपत्रे तपासुन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना पंजाबला जाण्याची परवानगी देण्यात आली. पंजाब येथून आलेल्या 4 बसेसमधूनच सर्व 105 भाविक आज पंजाबला रवाना झाले. त्यांना त्यांच्या प्रवासात लागणारे सर्व खाद्यपदार्थ देण्यात आले आहेत. तसेच बस कोठेही न थांबवता थेट पंजाब येथेच थांबणार असल्याचे, गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजितसिंह यांनी सांगितले.
हेही वाचा... लाॅकडाऊन: मुंबईहून मध्यप्रदेशकडे पायी निघालेल्या महिलेची नागपुरात प्रसूती...
पंजाबला जाणाऱ्या या सर्व बसेसचे आणि नागरिकांना सॅनिटाईज करण्यात आले. त्यानंतरच त्यांची रवानगी करण्यात आली. यावेळी पोलीस उप अधीक्षक समीरसिंग साळवे, उपजिल्हा रुगणालायचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एस. नरवणे, मुख्यधिकारी डॉ. दिलीप मेणकर उपस्थित होते.