नाशिक - अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये आग लागल्याने 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाच्या फायर ऑडिटचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला आहे. यामध्ये नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासह मालेगाव रुग्णालय तसेच जिल्ह्यातील 18 ग्रामीण व व उपजिल्हा रुग्णालयाचे मागील दोन वर्षापासून फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
आग प्रतिबंधक उपकरणावर जिल्ह्यातील 18 रुग्णालये -
राज्यातील विविध ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनेनंतर फायर ऑडिटचा प्रश्न समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी केवळ दोनच फायर ऑफिसर असल्याने ऑडीटचे काम वेळेत होत नसल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातून रोज शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी गर्दी करतात. या रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची संख्या पाहता त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे विविध व्यवस्था असायला हव्यात. परंतु, या रुग्णालयात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रथम उपाय म्हणून वापरली जाणारी आग प्रतिबंधक उपकरणाशिवाय कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याचे चित्र आहे. या रुग्णालयासाठी फायर सेफ्टी निधीची अडचण असल्याचे समोर आले आहे.
रुग्णालयायात शॉर्टसर्किटच्या घटना वाढल्या -
जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालयातील फायर यंत्रणेमध्ये सध्या तांत्रिक बिघाड होत असल्याच्या तक्रारी वाढल्या तसेच ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून शॉर्टसर्किटच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एकूण रुग्णांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करून त्यांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे का असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
फायर ऑडिट करणे बंधनकारक -
सर्व शासकीय कार्यालयांचे फायर ऑडिट करणे आवश्यक असून त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश असतांना जिल्ह्यातील रुग्णालयात त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय महानगरपालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय या ठिकाणी फायर सेफ्टीची कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णालयातही फायर सेफ्टीच्या कामासाठी स्वतंत्र निधी दिला जात नसल्याचे चित्र आहे. याठिकाणी दररोज हजारो रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येत असतात, अशात या रुग्णालयातील फायर सेफ्टीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेही वाचा - दिवाळीची खरेदी करून परतताना भीषण अपघातात तीन मुलींसह चार जण ठार