नांदेड - भोकर तालुक्यातील अनेक वाडी तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावातील जमिनीखालील पाणी पातळी खालावल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला आहे.
तालुक्यातील जांभळी गावातील नागरिकांना पाण्याचा आज काहीच पर्याय उपलब्ध नाही. प्रशासनाने गावाची तहान भागविण्यासाठी एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात केले होते. परंतु, पाणी पातळी खालावल्याने सदरील अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणी उपसा करण्यासाठी नागरिकांना अनेक तास पाण्याची वाट पहावी लागत आहे.
हजारो लोकसंख्या असलेल्या गावात केवळ एकच विहिर अधिग्रहण करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. भोकर तालुक्यात एकूण ५० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई असून केवळ २ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दिवसेंदिवस वाढलेल्या भीषण पाणीटंचाईमुळे अनेक गावातून टँकरची मागणी होत आहे. पाणी टंचाईमुळे गावातील अनेक महिला पुरुषांना घरकाम, मजुरी सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.