नागपूर - विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र, शहरातील प्रताप नगर शाळेतील शालेय पोषण आहारातील भातामध्ये मोठ्या प्रमाणात अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही शाळा मुखमंत्र्याच्या विधानसभा मतदारसंघातच येते.
शुक्रवारी मधल्या सुटीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आहार वाटप करायला सुरुवात केली, मात्र भात कच्चा असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. भाताची अधिक पाहणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अळ्या असल्याचे त्यांना आढळून आले. काही अनर्थ घडण्याआधी त्यांनी प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना दिलेला भात व डाळ परत मागविली. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांना महिती दिल्यावर त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे या बद्दल तक्रार केली. यासोबतच, विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण काही दिवस थांबविण्यावचे आदेश दिले.
भाजप पदाधिकाऱ्याच्या कंपनीकडे अन्न पुरवण्याचे कंत्राट-
सौरभ महिला विकास मंच या केटरिंग कंपनीला प्रताप नगर शाळेचे कंत्राट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही केटरिंग कंपनी नागपूरच्या नगराध्यक्षा रूपा रॉय यांची आहे अशी माहिती मिळत आहे. अन्न व औषध प्रशासनाने, याबाबत सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.