नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांच्या अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण आज जाहिर करण्यात आले. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. १२ मे रोजी निवडणूक आयोगाद्वारे प्रभाग रचनेचे अंतिम प्रारूप मंजुर करण्यात आले. २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाख ४७ हजार ४९४ ऐवढी आहे. यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ४८ हजार ७ हजार ५९ आहे तर अनुसूचित जमातीच्या नागरिकांची लोकसंख्या १ लाख ८८ हजार ४४४ एवढी आहे.
अनुसूचित जातीकरिता ३१ जागा आरक्षित:- नागपूर शहराची ५२ प्रभागामध्ये विभागणी करण्यात आली असून त्रिस्तरीय प्रभागरचना करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण सदस्यसंख्या १५६ असणार आहे. यापैकी ५० टक्के अर्थात ७८ जागा महिलांसाठी राखीव असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाद्वारे सर्वसाधारण महिलांकरिता ४४ जागा थेट नेमून दिलेल्या आहेत. अनुसूचित जातीकरिता एकूण ३१ जागा आरक्षित असून त्यातील १६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीकरीता १२ जागा राखीव असून त्यापैकी ६ जागा महिलांकरिता राखीव असून त्यांची सोडत आज काढण्यात आली.
असे आहे निश्चित झालेले आरक्षण :- अनुसूचित जातीसाठी आरक्षित ३१ प्रभागाच्या चिठ्ठ्यांमधून महिलांच्या १६ जागा काढण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक १ अ, २ अ, १० अ, १३ अ, १४ अ, १५ अ, १६ अ, २० अ, २७ अ, ३० अ, ३७ अ, ३८ अ, ३९ अ, ४३ अ, ४५ अ आणि ५२ अ असे अनुसूचित जाती महिलांचे प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले. अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक ४ ब, १२ ब आणि ५१ ब या तीन प्रभागांची थेट निश्चित करण्यात आले. यानंतर उर्वरित ३ जागांसाठी अनुसूचित जमातीच्या उर्वरीत ९ जागामधुन ३ चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक २४ अ, ११ अ आणि ३७ ब चे अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
महिलांच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण १७ चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यापैकी १२ चिठ्ठ्या काढून त्यातून सर्वसाधारण माहितीकरीता १२ जागांचे आरक्षण जाहिर करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक ६ ब, १७ अ, २२ ब, २३ ब, २९ ब, ३१ ब, ३२ ब, ३५ ब, ४० ब, ४२ ब, ४८ ब आणि ४९ ब या १२ प्रभागांचे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले.