नागपूर - 'महिला जेवढे नवरे बदलतात तेवढे त्यांचे कुंकू मोठे होत जाते,' असे वादग्रस्त विधान आमदार जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे यांनी केले होते. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या समर्थनार्थ आयोजित प्रचारसभेमध्ये ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
जयदीप कवाडेंनी केलेल्या या वक्तव्याचा भाजप महिला शहर आघाडीतर्फे काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला. या मूक प्रदर्शनात महिलांनी काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून कपाळावर मोठे कुंकू लावले होते. तसेच ५ महिला समन्वयकांनी पोलीस अधीक्षकांना या वक्तव्याच्या निषेधार्थ कारवाई करावी यासाठी निवेदन दिले. नागपूरच्या महापौर नंदा जिचकारदेखील या निषेध मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. कवाडे यांनी अप्रत्यक्ष स्मृती ईराणींबद्दल हे वक्तव्य केले होते. मात्र, या भाषणाने सर्वच महिलांचा अनादर झाल्याचे आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले. त्यांच्या वादग्रस्त विधानाला काँग्रेसच्या नेत्यांनी हसून दाद दिली. त्यामुळे त्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचे भाजप महिला कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.