नागपूर - देशात रोज वाढत असलेल्या महागाईमुळे लोक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि गॅसचेही रोज भाव वाढत आहेत. या दरवाढीविरोधात ७ ते १७ जुलै दरम्यान काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सायकल मोर्चा काढत आंदोलनाच्या सत्राला सुरुवात केली होती. आज काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वात नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली. एवढेच नाही तर आंदोलक महिलांनी आग विझलेल्या चुलीवर तेला ऐवजी पाण्यात भाजी फोडणी देऊन आपला निषेध नोंदवला आहे.
काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन
गेल्या काही वर्षांपासून देशात महागाईचा आगडोंब उसळलेला आहे. या भडक्यात सर्वसामान्य जनता होरपळून निघते आहे. मात्र, केंद्र सरकार जनेतला मदत करण्याऐवजी आणखी संकटात लोटण्याचे काम करत असल्याचा आरोप महिला काँगेसच्या कार्यकर्त्यांनी केला. एकीकडे इंधनाचे दर सतत वाढत आहेत. पेट्रोलचे दर तर १०५ रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहेत. तर, डिझेलनेही शंभरी गाठली आहे. तसेच, गॅस सिलेंडरही नऊशे रूपायांपर्यंत पोहचले आहे. या विरोधात काँग्रेसने राज्यभरात आंदोलनांची रूपरेषा आखली आहे. या पार्श्वभूमीवर आज महिला काँग्रेसकडून नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
बऱ्याच वर्षांनी आंदोलनात गट-तट आले एकत्र
आज महिला काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आंदोलनात अनेक गटातटात विभागलेल्या महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आंदोलनात सहभाग नोंदवला. एरवी नागपूरमध्ये केवळ आपल्याच नेत्याच्या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते सहभागी व्हायचे. यामध्ये अनेकवेळा नेत्यांमध्ये असलेले मतभेद स्पष्ठपणे जाणवायचे. काल देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आंदोलनात पालकमंत्री नितीन राऊत उपस्थित नव्हते. मात्र, आज महिला कार्यकर्त्यांनी जुने वाद बाजूला करून एकत्र येत आंदोलनाचा आवाज बुलंद केला. काँग्रेसमध्ये असे एकोप्याचे चित्र नागपूरात बऱ्यात दिवसांनी पाहायला मिळाले आहे.