नागपूर - शहरातील डागा स्त्री रुग्णलायत प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला रुग्णालयात वेळीच दाखल करून न घेतल्याने रुग्णालयाच्या व्हरांड्यातच तिची प्रसूती झाली. दुर्दैवाने या घटनेत बाळाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर रुग्ण महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत गोंधळ घातला. यावेळी महिलेच्या पतीने या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच ते बाळ हे रुग्णालयात आणण्यापूर्वी काही तासाअगोदर गर्भातच दगावले असल्याचा दावा रुग्णालयाकडून करण्यात आला आहे.
मूळची दाभावाडी येथील रहिवासी असलेली राणी वासनिक(27) ही बाळंतपणासाठी कन्हान येथे माहेरी आली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास प्रसूतीपूर्व कळा सुरू झाल्याने तिला माहेरच्या कुटुंबीयांनी कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथून तिला नागपूर शहरातील डागा शासकीय स्त्री रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला देण्यात आला. डागा रुग्णालयात पोहोचले असता, राणी यांना रुग्णलायत दाखल करून घेण्यास रुग्णालय कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करत उशीर केला. तसेच उशिरा आणले इतक्या वेळ तुम्ही झोपून होतात का? अशा शब्दात रुग्णाच्या कुटुंबीयांनाच सुनावले, असा आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. दरम्यान रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी उशीर होत असताना राणी यांची रुग्णालयाच्या व्हरांड्यातच प्रसूती झाली आणि बाळ दगावले.
कुटुंबीयांनी केला प्रसूतीचा व्हिडिओ शूट-
यावेळी संतप्त वासनिक कुटुंबियांनी या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ शूट केला. मात्र रुग्णालयात दाखल न करून घेता व्हराड्यात प्रसुती झाल्याचा व्हिडिओ समरो येताच रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सीमा पारवेकर यांनी महिलेच्या पतीने कामात अडथळा निर्माण केला. तसेच स्टाफला धमकावले असल्याचा आरोप केला. याशिवाय राणी यांना प्रसुतीसाठी रुग्णालयात आणले तेव्हा अवघ्या 10 मिनिटात परिचारिकांनी प्रसंगावधान राखत तिला उपचारासाठी दाखल करून घेतले. मात्र त्यावेळेस राणी यांची अवस्था लेबररूम पर्यंत नेऊन प्रसुती करण्याची नव्हती. त्यामुळे परिचारिकांनी व्हरांड्यातच जमिनीवर बसवून प्रसूती केल्याचा दावा डॉ. पारवेकर यांनी केला.
बाळाचा मृत्यू पोटातच, प्रशासनाचा दावा-
राणी वासनिक यांच्या जुन्या मेडिकल रेकॉर्ड प्रमाणे आधी करण्यात आलेल्या सोनोग्राफी अहवालामध्ये बाळाची नाळ खालच्या दिशेने होती. त्यामुळे राणी यांची प्रसूती अडचणीची होती. प्रसूती दरम्यान बाळ बाहेर निघाले तेव्हा ते मृतावस्थेत होते. तसेच प्रसुतीच्या दोन ते तीन तास अगोदर बाळाने गर्भातच शी केल्याने त्याचा आतमध्येच मृत्यू झाला असावा अशी शक्यता डॉक्टर पारवेकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाने कुटुंबीयांची पोलिसांकडे तक्रार देत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केलेला नाही.
या प्रकरणाची चौकशी होणार-
या बाळाचा मृत्यू झाल्याने वासनिक कुटुंबीयांनी देखील तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी मागणी केली आहे. या मागणीनंतर प्रशासनाकडून मेडिकल आणि मेयोच्या वैदकीय तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. तसेच डागा स्त्री रुग्णालयचा वतीने अंतर्गत समिती गठीत करून चौकशी सुरू केली अशी माहिती वैदकीय अधिक्षिका डॉ. सीमा पारवेकर यांनी दिली आहे.