नागपूर - अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला असतानादेखील राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही मदत जाहीर झालेली नाही. ज्यावेळी मोठी नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा नजर आणेवारीच्या आधारावर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे राज्यसरकारने तातडीने मदत जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा, असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. उद्यापासून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
'मदतीच्या घोषणा हवेत विरल्या का?' -
यापूर्वी राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस राज्य सरकारकडून ज्या-ज्या घोषणा करण्यात आलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कुठल्याच घोषणेची अद्याप पूर्तता झालेली नाही. आतापर्यंत जेवढ्या नैसर्गिक आपत्ती आल्या, त्यानंतर करण्यात आलेल्या सर्व घोषणा कागदावरच राहिल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शेतकऱ्यांपर्यत अद्यापही मदत पोहोचलेली नाही. अगदी कोकण उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ या सर्व भागात आलेल्या आपत्ती वेळी झालेल्या घोषणा पूर्ण झालेल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
'अधिकाऱ्यांना सीबीआयाच्या समन्सची माहिती नाही' -
राज्यातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना सीबीआने नोटीस बजावण्याची माहिती पुढे आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. यासंदर्भात विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की मला या विषयाची माहिती नाही. माध्यमातूनच अशी चर्चा एक आहे. मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे दोन्ही पद महत्त्वाचे आहे. त्यामुळे माहिती मिळाल्या शिवाय यावर काहीही प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले.
'नाना पटोले अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांचा संदर्भात बोलू शकतात' -
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चिमटा काढला आहे. नाना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या संदर्भातदेखील बोलू शकतात. त्यामुळे प्रत्येक वक्त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - बस-कंटेनरचा भीषण अपघात, ७ प्रवासी जागीच ठार, १३ जखमी