नागपूर : कोरोनामुळे अनेक बैठकी होऊ शकल्या नाही. तसेच हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होणार असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठी इथे आल्याचे सामान्य प्रशासन तथा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले. कोरोनाच्या संकटामुळे भीती होती. पण आता रुग्णसंख्या कमी असल्याने नागपुरात अधिवेशन होईल असे ते यावेळी म्हणाले.
अधिवेशन नागपुरातच
सध्याच्या घडीला कोरोनाची आकडेवारी पाहता अधिवेशन हे नागपुरात होईल असेच संकेत आहेत. त्याचा आढावा आज होणाऱ्या बैठकीत घेणार असल्याचेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. अधिवेशनासाठी प्रशासन तयार आहे. पुढील आठवड्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यातही निर्णय होईल, पण अधिवेशन नागपुरात होणार असे संकेत त्यांनी दिले आहेत.
शिकाऱ्यांवर कारवाई होणार
मागील काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वन तस्करांवर कारवाई झालेली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होईल. तसेच गरज पडल्यास आणखी कठोर पावले त्या दिशेने उचलली जाणार असल्याचेही मंत्री भरणे यावेळी म्हणाले. आज आंतरराष्ट्रीय बाळासाहेब ठाकरे प्राणी संग्रहालयाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या काही संकल्पना असतील, त्या अनुषंगाने पावले उचलूनन सुधारणा केल्या जातील असे ते म्हणाले.