नागपूर - गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर काही दिवसांपूर्वी हजारो कोटींचे ड्रग्ज मिळून आले होते. या प्रकरणात गौतम अदानी यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी मोहन प्रकाश यांनी केली आहे. तसेच त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
- अदानींना कधी अटक करणार? - मोहन प्रकाश
मागील काही महिन्यांपूर्वी एका मुलीकडे दोन ड्रग्जचे पॅकेट आढळून आले होते. तेव्हा तीन महिने ती तरुणी अटकेत होती. सीबीआय, एनसीबी, ईडी या तपास यंत्रणा लावून तिची चौकशी करण्यात आली. मग मुंद्रा पोर्टवरही यापूर्वी अनेकदा ड्रग्ज पकडण्यात आले होते. त्या प्रकरणांमध्ये अदानींना का अटक करण्यात आली नाही? त्यांना केव्हा अटक होणार? असे अनेक प्रश्न मोहन प्रकाश यांनी भाजपला विचारले आहेत. नुकतेच गुजरातच्या मुद्रा पोर्टवर 21 हजार कोटींचे ड्रग्ज सापडले होते. देशातील युवा पिढीला याची लत लावून बरबाद करण्याचे काम सुरू असल्याचेही मोहन प्रकाश म्हणाले.
हेही वाचा - 7 ऑक्टोबरपासून साई मंदिर दर्शनासाठी खुले होणार; दररोज 15 हजार भक्तांनाच प्रवेश
- लखीमपूर घटनेवरून मोदी सरकारवर टीका -
लखीमपूर येथील घटनेचा यावेळी काँग्रेसने निषेध केला. काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना अशा पद्धतीच्या घटना कधीही घडल्या नाहीत. मंत्र्यांच्या मुलाने चक्क शेतकऱ्यांच्या आंदोलनात गाडी चढवत, त्यांचा जीव घेण्यात आला. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री योगी हे कोणत्याही राजकीय पक्षातील लोकांना लाखीमपूरच्या घटनेतील मृतकांच्या कुटुंबियांना भेटू देत नाहीत. मृतकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणे ही परंपरा असल्याचे मोहन प्रकाश म्हणाले.
- 'भागवत निर्देशित मोदी सरकार' -
या देशाची सरकार 'भागवत निर्देशित मोदी सरकार' असल्याचे म्हणत मोहन प्रकाश यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि मोदी सरकारवर खोचक टीका केली. शहा आणि तानाशहा अशी उपमा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना देऊन, देशात तानाशाही पद्धतीने काम चालत असल्याचा आरोप मोहन प्रकाश यांनी केला आहे. या देशात लोकशाहीला मार्गावरून हटवून तानाशाहीकडे नेले जात असल्याचेही ते म्हणाले.