नागपूर - नेतृत्व नसलेल्या काँग्रेसचा भारतीय जनता पक्ष फायदा घेत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिउत्तर दिले आहे. संजय राऊत हे पत्रकार आहेत आणि एका पत्रकाराला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो अशी काँग्रेसची धारणा आहे, मात्र भारतीय जनता पक्षाला हे कळत नाही, ज्या पत्रकाराने किवा संपादकाने आपले मत मांडले त्याच्यावर ईडी मार्फत कारवाई केली जाते असा टोला पटोलेंनी लगावला आहे. काँग्रेस पक्षामध्ये काय चांगले करायचे आहे हे काँग्रेसला माहीत आहे. काँग्रेस हा कालच पक्ष नसून याला मोठी परंपरा आणि इतिहास आहे. त्यामुळे आम्हाला काय करायचे आहे हे आम्हाला कळतं असे सांगून नाना पटोले यांनी संजय राऊत यांना प्रतिउत्तर दिले आहे.
देशाचे नागरिक गोडसे विचाराला संपुष्टात आणतील -
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने देशभरात त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे, मात्र काही ठिकाणी गोडसे यांच्या समर्थानात घोषणा देण्यात आल्या आहेत. यावर नाना पटोले म्हणाले की केंद्रात गोडसे विचारांचे सरकार अस्तित्वात आहे, त्यांना महात्मा गांधी यांच्या विचारांना संपवायचे आहे. मात्र देशातील लोकांना सर्व कळत आहे ते लवकरच गोडसे विचारांना संपुष्टात आणतील असे पटोले म्हणाले.
विरोधकांनी केंद्रातून निधी आणावा -
आजपासून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर गेले आहेत. अतिवृष्टी झालेल्या भागाचे दौरे करून मगरमच्छ सारखे अश्रू काढण्यापेक्षा केंद्राकडे जाऊन निधी आणावा तर लोकं तुम्हाला शाबासकी देतील असा टोला नाना पटोले यांनी लावला आहे. २०१९ पासून केंद्र सरकारने महाराष्ट्रासोबत दुजाभाव सुरू केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
फडणवीसांचा टोला हा केंद्र सरकार लागू होतो -
काल यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात एका सभेत बोलताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच सत्ता परिवर्तन होणार, राज्य सरकार अमरपट्टा घालून आलेले नाही असे वक्तव्य केले होते. यावर नाना पटोले यांनी प्रतिउत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य हे केंद्र सरकारसाठी आहे, तेच अमरपट्टा घालून आल्यासारखे वागत आहेत, असा टोला पटोले यांनी लगावला.
परमबीर सिंह यांचे शेवटचे लोकेशन अमहदाबाद -
वाझे प्रकरणानंतर तपास हा सीबीआय आणि ईडीकडे गेलेला आहे. त्यांच्या खुलाश्यानुसार परमबीर सिंह यांचे शेवटचे लोकेशन अमहदाबाद येथे दिसून आले आहे. त्यामुळे ते कुठे आहेत या बद्दल नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना माहिती असेल. परमबीर सिंह यांचे पलायन करण्यामागे दिल्लीतील सरकारच जबाबदार असेल असे आम्हाला वाटत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा - ...म्हणून भाजपाला ज्योतिष बदलण्याची गरज; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची खोचक टीका