नागपूर - उन्हाळा आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या विदर्भातील नागरिकांना इतक्यात दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या मान्सूनचे आगमन लांबल्याने पुढील दोन दिवस ते तीन दिवस विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये 'हिट वे' (उष्णतेची लाट) चा इशारा देण्यात आला आहे. केरळमध्ये मान्सून निर्धारित वेळेच्या तीन दिवस अगोदर दाखल झाला आहे. तरी विदर्भात 10 जून ते 16 जूनच्या मध्येच मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी वर्तवली आहे. या दरम्यान मान्सूनपूर्व पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली ( Warning of heat wave in Vidarbha ) आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत दिवसाचे तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअस इतके नोंदवले जात आहे. तर, रात्री देखील उष्ण वारे वाहत असल्याने तापमानाचा पारा सामन्य पेक्षा 5 सेल्सिअसने वाढला आहे. त्यामुळे कुलर आणि वातानुकूलित (एसी) सुद्धा काम करत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येकाचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागलेले आहेत. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात पावसाचे आगमन होते. मात्र, यावर्षी भारतात मान्सून वेळेवर दाखल झाला, तरी विदर्भात निर्धारित वेळेवर (10 ते 15) जून दरम्यान पावसाचे आगमन होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
गेल्या दहा वर्षात कधी झाले पावसाचे आगमन - विदर्भात साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन होते. गेल्या दहा वर्षात विदर्भात कोणत्या तारखेला मानसूनचे आगमन झाले, यावर एक नजर टाकूया. २०१२ साली 18 जून रोजी विदर्भात पावसाचे आगमन झाले आहे. तर २०१३ साली १० जून रोजी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. २०१४ साली १९ जून, २०१५ साली १४ जून, २०१६ साली १९ जून, २०१७ साली २२ जून, २०१८ साली ८ जून, २०१९ साली २३ जून, २०२० साली १३ जून, २०२१ साली ९ जून रोजी विदर्भात मान्सून सक्रिय झाला होता.
उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस - गेल्या दोन वर्षात विदर्भात उन्हाळ्याची दाहकता कमी झाली होती. मात्र, यावर्षी सर्व कसर भरून निघाली आहे. यावर्षी उन्हाळ्यात अनेकदा तापमानाचा पारा 45 डिग्रीच्या पुढे नोंदवण्यात आला होता. २९ एप्रिल रोजी तपमानाचा पारा ४५.२ सेल्सियस नोंदवण्यात आला होता. तर, १४ मे रोजी ४५.४ सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. 3 जून रोजी तापमानाचा पारा ४६.२ सेल्सियस पर्यंत गेला होता.
नवतपा संपला तरी पावसाची प्रतीक्षा कायम - नवतपा दरम्यान सूर्यनारायनाने पूर्ण क्षमतेने आग ओकल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा मोसमी पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मात्र, यावर्षी हवामानात झालेल्या बदलामुळे पारा कमी होण्याऐवजी वाढल्याने अजूनही नवतपाचा ताप कायम असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात 'हिट-वे' चा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचं स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - Shivsena Teaser : सत्ता असो वा नसो, आमचं हिंदुत्व तकलादू नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा हल्लाबोल