नागपूर :- दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दारू पार्टी रंगली होती, त्याचे व्हिडीओ आता व्हायरल झाले आहेत. कार्यालयातील मुख्य अधिकारी,त्यांचे सहकारी आणि नगर पंचायतचे माजी उपाध्यक्ष दारुचे घोट घेत आहेत. त्यामुळे हे कार्यालय दारू पार्टीचा अड्डा बनले का असा प्रश्न विचारला जात आहे. या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते विवेक ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बुधवारी सायंकाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. दुय्यम निबंधक कार्यालयात सकाळपासूनच विविध मालमत्तेच्या खरेदी - विक्रीच्या व्यवहारासंदर्भात सामान्य नागरिकांची गर्दी होती. मात्र, संध्याकाळ होताच जेव्हा कार्यालयात कर्मचाऱ्यांशिवाय कुणीही उपस्थित नव्हते. तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी दारु पिण्यास सुरूवात केली.
कार्यालय हलवण्याच्या सूचना
भिवापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय सध्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत सुरू आहे. स्वतःच्या मालकीची इमारत नसल्यामुळे काही वर्षांपूर्वी दुय्यम निबंधक कार्यालयात सुरू करण्यात आले होते. मात्र, आता दुय्यम निबंधक कार्यालयासाठी नवनिर्मित इमारत तयार झाली आहे. ओल्या पार्टीचा प्रकार समोर आल्यानंतर तहसीलदारांनी तत्काळ कार्यालय हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत.