नागपूर - राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तीसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याचा आंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमधून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. नागपूरमध्ये 6 ते 12 वयोगटातील 20 मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
20 मुलांचे लसीकरण
नागपुरातील मेडीट्रिना हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण चाचणीला 6 जून पासून सुरुवात झाली. यात पहिल्या टप्पात सकारात्मक परिणाम समोर आला आहे. या चाचणीमध्ये एका मुलाला ताप वगळता कुठलेच साईड इफेक्ट दिसून आले नाही. ही चाचणी 25 बालकांवर करण्यात येणार असून, बुधवारी 20 मुलांना लसीचा डोस देण्यात आला. गुरुवारी आणखी 5 मुलांना हा डोस देण्यात येणार आहे. ज्या बालकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, अशा बालकांना आता 28 दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे. दुसरा डोस दिल्यानंतर तीन वेळा त्यांच्या रक्ताची चाचणी करण्यात येणार आहे. या कोरोना लसीकरणाच्या चाचणी प्रक्रियेसाठी एकूण 7 महिन्यांचा वेळ लागणार आहे.
हेही वाचा - सोने-चांदी खरेदी करणार आहात... थांबा!!! जाणून घ्या नवीन नियम, कायदे... त्यांचे फायदे