नागपूर - शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार अनियंत्रित होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राशी पटेल आणि भावना यादव असे अपघातात मृत झालेल्या तरुणींची नावे आहेत. अंबाझरी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपी वाहन चालकाने नशा केली होती का, या बाबत पोलीस तपास करत आहेत. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी स्पष्ट केले आहे.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चार मित्र-मैत्रिणी नागपूर-अमरावती महामार्गावरील एका हॉटेलमधून जेवण आटोपून नागपूरच्या दिशेने येत असताना फुटाळा उतारावर त्यांची कार अनियंत्रित झाली. आधी कार झाडाला आणि त्यानंतर भिंतीवर आदळली. या अपघातात कारच्या पाठीमागील सीटवर बसलेल्या दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या होत्या. दोघींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दोन्ही तरुणीचा मृत्यू झालाय. राशी पटेल आणि भावना यादव असे अपघातात मृत झालेल्या तरुणींची नावे आहेत.
हे ही वाचा - वाढदिवसाला कपडे भेट देऊन दाजीचा अल्पवयीन मेहुणीवर कारमध्ये बलात्कार, बुलडाण्यातील प्रकार
कार चालक पोलिसांच्या ताब्यात -
घटनेची माहिती समजताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी बेजबाबदारपणे कार चालवल्या प्रकरणी चिराग नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.