नागपूर - शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोक्षधाम दहन घाटावर दोन आरोपींनी मिळून लखन गायकवाड नामक तरुणाची हत्या केली आहे.
हेही वाचा - सचिन वाझेंची आणखी एक गाडी एनआयएने केली जप्त
गणेशपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा मृत लखन, आरोपी चेतन उर्फ बाबा मंडल आणि तन्मय उर्फ भदया नगराळे असे तिघे दारू पिण्यासाठी एकत्र आले होते. लखन हा मोक्षधाम दहन घाटावरच काम करत असल्याने त्यांनी दारू पिण्यासाठी तीच जागा निवडली. दारू पित असताना आरोपी आणि मृतकाचा जुन्या वादातून भांडण सुरू झाले. लखन गायकवाड आणि आरोपी चेतन मंडल, तन्मय नगराळे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. दारूच्या नशेत तो वाद आणखी उफाळून आला. त्याचवेळी आरोपी चेतन आणि तन्मय यांनी त्यांच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्रांनी लखनवर सपासप वार केले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणातील मृत हा मोक्षधाम दहन घाटावर सुलभ शौचालय येथे काम करायचा तर एक आरोपी हा त्याच परिसरात चहाचे दुकान लावायला आणि दुसरा आरोपी हा ट्रक चालक होता. एकाच परिसरात हे तिघेही राहत असल्याने त्यांच्यात मैत्री होती,मात्र क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी लखनचा खून केल्यानंतर पळ काढला आहे. पोलिसांनी देखील दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला असून लवकरच त्यांना अटक केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर यांनी दिली आहे.
हेही वाचा - परमबीर सिंग यांच्या याचिकेवर ३१ मार्चला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी