नागपूर - महानगरपालिकेच्या आयुक्तपदी धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
मुंढे हे अतिशय शिस्तप्रिय अधिकारी असल्याने त्यांच्या नियुक्तीने बेशिस्त अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले आहेत. मुंढे यांच्या शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे अनेक राजकीय नेत्यांचा त्यांच्याशी छत्तीसचा आकडा आहे. तसेच अनेक अधिरकाऱ्यांसोबत त्यांचे खटके उडतात. यामुळेच 14 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची 13 वेळा बदली झाली आहे.
सनदी अधिकारी होण्यापूर्वी तुकाराम मुंढे यांनी 2001 मध्ये राज्यसेवा परीक्षेत यश मिळवले. त्यानंतर 2005 मध्ये ते केंद्रीय लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या सेवेची सुरुवात सोलापुरातून झाली. यानंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली. येथून ते नांदेडला उपजिल्हाधिकारी म्हणून गेले.
2008 साली त्यांची नागपूर जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली. यावेळी पदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या दिवशीच त्यांनी काही शाळांना भेट दिली. यावेळी अनेक शाळांमधील शिक्षक गैरहजर दिसल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशी संबंधितांच्या निलंबनाचे आदेश दिले. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना देखील निलंबित केले होते. इतिहासात पहिल्यांदाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने डॉक्टरला निलंबित केल्याची ही घटना होती.
बेधडक कामकाजामुळे अनेक जणांचे हितसंबंध दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. राजकीय नाराजी ओढावून घेतल्याने जिल्हा परिषदेत त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 2009 साली नागपूरहून त्यांची बदली नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त पदावर करण्यात आली. त्यानंतर काही काळ त्यांनी नवी मुंबईचे पालिका आयुक्त पदावर देखील काम केले. आता पुन्हा त्यांची बदली नागपूर महानगरपालिका आयुक्तपदी करण्यात आली आहे.