नागपूर - तब्बल तीन महिन्यानंतर आयोजित करण्यात आलेली नागपूर महानगरपालिकेची सभा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सभात्यागामुळे चांगलीच गाजली. मुंढे यांनी समजुतदारपणा दाखवून प्रकरण निस्तरायला पाहिजे होते, अस महापौर आणि काँग्रेस नेत्यांचे म्हणने आहे. तर दुसरीकडे युवक काँग्रेस मुंढेंच्या समर्थानात रस्त्यावर उतरली आहे.
नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यावरून अगोदरच आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष रंगला होता. मात्र, राज्य सरकारने सभेला परवानगी दिल्याने आज सभा घेण्यात आली. सभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच महापालिकेने शहरातील एका इमारतीचा वापर बदलला याबाबत काँग्रेसच्या नगर सेवकाने प्रश्न उपस्थिती केला. त्यावरून सभागृहात संघर्षाला सुरुवात झाली व मुंढेंवर वैयक्तिक टीका करण्यात आली. त्यावर मुंढे यांनी आक्षेप घेतला व ते सभागृहातून निघून गेले.
जे प्रकरण सभागृहासमोर आले त्यावर आयुक्तांनी उत्तर देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी उत्तर न देता राग दाखवला व निघून गेले. लोक प्रतिनिधी आपल्या भागातील प्रश्न विचारणारच. त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत कदाचित चुकीची असेल, त्यावर आयुक्तांना आक्षेप घेत आला असता. मात्र, असे न करता आयुक्त सरळ निघून गेले हे योग्य नव्हते. त्यांनी एक पाऊल मागे घ्यावे, आम्हीही एक पाऊल मागे घेतो. आयुक्त मुंढेंनी समजुतदारपणा दाखवत मंगळवारी सभागृहात यावे, असे मत महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केले.
जो प्रश्न काँग्रेसच्या नगर सेवकाने उपस्थित केला, त्यासाठी चौकशी समिती नेमणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. दरम्यान, आता मंगळवारी होणाऱ्या सभेला आयुक्त उपस्थित राहतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.