नागपूर - लखीमपूर येथे शेतकरी नरसंहारच्या घटनेनंतर त्याचे पडसाद म्हणून आज (सोमवारी) महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली. मात्र व्यापारी वर्गाकडून या बंदला विरोध दर्शवला आहे. 'बंद करायचा असेल तर सरकारी कार्यालय बंद करा, आम्हाला बकरा का बनवतात', असा सवाल नागपुरातील व्यापाऱ्यांनी केला आहे. सकाळपासून नागपूरच्या विविध भागात आंदोलनाला सुरुवात झाली. शहरातील सक्करदरा चौकसह नागपूरच्या सीताबर्डी बाजापेठेतील व्हेरायटी चौकात गांधी पुतळ्याजवळ एकत्र येत घोषणाबाजी आणि विरोध प्रदर्शनाला सुरुवात झाले. काही वेळ आंदोलकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत निषेधार्थ धरणे दिले. त्यानंतर सर्व पक्षाचे नेते सीताबर्डी बाजारकडे वळले.
कुठे बंद तर कुठे सुरु
सकाळची वेळ असल्याने काही दुकाने बंद असल्याचे पहायला मिळाली. तर काही दुकाने आंदोलकांच्या अंदाज घेत अर्धवट खुली होती. यावेळी आंदोलक हे दुकानासमोर जाणवून घोषणाबाजी करत होते. तर काही जण दुकाना 10 मिनिटांसाठी तरी बंद करा, असेही काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणत असल्याचे पहायला मिळाले. यात काही व्यापाऱ्यांनी स्वत: दुकाने बंद ठेवले होते. एकंदरितच आंदोलन हे केवळ 10 मिनिटांसाठी होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.
नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सने केला होता बंदला विरोध
नागपूरच्या नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने बंदला विरोध दर्शविला होता. लखीमपुरात झालेल्या शेतकरी हिंसाचार घटनेचा निषेध आहे. पण आजच्या घडीला एक दिवस बंद ठेवले तरी लोक हे ऑनलाइन बाजारपेठेकडे वळतात. त्यामुळे ज्या व्यपाऱ्यांना स्वच्छेनुसार बंद ठेवायचे त्यांनी ठेवावे.मात्र कोणत्याही व्यापाऱ्याला आग्रह करू नये, पोलीस प्रशासनाने व्यापारांसोबत अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केले होते. त्यानुसार काहीनी स्वत:हून सकाळच्या वेळेत दुकाने बंद ठेवल्याचे पाहायला मिळाले.
'आम्हाला बकरा का बनवता'
बंद करायला बरेच काही बंद करता येऊ शकते. आज सरकारी कार्यलये सर्वच सुरू आहे. सर्व निर्माण फॅकट्री सुरू आहे. नेहमी नेहमी बंदसाठी लहान व्यपारी यांनाच का निवडता, बँका सुरू आहे, सरकारी युनिट 100 टक्के सुरू आहे. खासगीत आम्हा लहान व्यापारी वर्गांनाच का 'बकरा बनवले' जाते, असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. आधीच कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. अशात एक दिवस दुकान बंद ठेवणे म्हणजे आम्हा व्यापाऱ्यांना फटका असल्याची भावना व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली.
असा होता पोलीस बंदोबस्त
आज (सोमवारी) बंद असल्याने पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा बंदोबस्त केला होता. महिला आघाडीकडून सीताबर्डी चौकात रस्ता अडवण्याचा प्रयत्न असल्याचे कळताच पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न उधळला. दुकानदारांवर कोणत्याही राजकीय पक्षातील किंवा आंदोलनकर्ते जावू नये, यासाठी देखील पोलिसांनी तगडा बंदोबस्त केल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा - महाराष्ट्र बंद म्हणजे आघाडी सरकारचा "कांगावा" - गोपीचंद पडळकर