नागपूर - कोरोनानंतर राज्यात मूक्यरमायकोसिस या आजाराने थैमान घालायला सुरुवात केली आहे. या बुरशीजन्य संसर्गाने आतापर्यंत नागपुरात तब्बल २६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ६०० हून अधिक जणांना याचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
'600 म्यूकरमायकोसिस रूग्णांना बरे करण्यात यश'
गेल्या मार्चपासून आतापर्यंत तब्बल 600 हून अधिक रुग्णांना म्यूकरमायकोसिसची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे करण्यात यश आले असल्याचा दावा विदर्भातील कान-नाक-घसा डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत निखाडे यांनी केला आहे. मात्र 284 जणांना याची बाधा झाली असून 7 जणांच्या मृत्यूची नोंद शासन दरबारी असल्याचे समोर आले आहे. पण संघटनेकडून घेण्यात आलेल्या आकडेवारीत 26 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोरोना रूग्णांना काळजी घेण्याची गरज
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यात रुग्णांनी घरी जाण्यापूर्वीची मुखरोगाचे परीक्षण केल्यास अधिक फायद्याचे ठरू शकते. शिवाय घरी गेल्यानंतरही वेळोवेळी शुगरची चाचणी करून घेत प्रमाण तपासत राहिले पाहिजे. यासोबत काही लक्षणे असल्यास दुर्लक्ष करू नये असेही सांगितले जात आहे.
कोरोनापासून दूर राहण्याची गरज
म्यूकरमायकोसिस या आजाराचा मधुमेह, किडनी, लिव्हरची समस्या असणाऱ्या रुग्णांना अधिक धोका संभवत आहे. कोरोनात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास हा आजार घातक ठरत आहे. यामुळे कोरोना होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अशी लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा
- चेहऱ्यावरील स्नायू दुखणे
- बधिरपणा जाणवणे
- नाकावर सूज येणे
- नाकपुडीतून रक्तस्त्राव होणे
- चेहरा, डोळ्यावर सूज येणे
- एक पापणी अर्धी बंद राहणे
- डोळे दुखणे
- वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे
- ताप येणे
- अस्पष्ट दिसणे
काय काळजी घ्यायची
- रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवणे
- कान, नाक, घसा, नेत्र, दंतरोग तज्ञ यांच्याकडून तपासणी करणे
- लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधणे
- टूथब्रश/मास्क वरचेवर बदलणे
- कोमट पाण्याने गुळण्या करणे
- स्वछता ठेवणे
दरम्यान, या आजाराला सहजतेणे घेऊ नका. वेळीच सल्ला घ्या. छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती उपायांचा पर्याय निवडू नका. वैद्यकीय सल्ल्याने स्टोरॉईड व औषधाचा वापर करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - नौदलाचे आभार मानताना 'बार्ज'वरील कर्मचाऱ्याला अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ..