नागपूर - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, बधितांच्या मृत्यूचा आकडा मात्र कमी होतानाचे चित्र दिसून येत नाही. रविवारी आलेल्या आकडेवारीत नवीन बाधितांच्या संख्येत घसरण पाहायला मिळाली. मागील 24 तासांत 5007 रुग्ण बाधित झाले आहेत. तर 6 हजार 376 जणांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजे बाधितांच्या तुलनेत 1369 अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. मात्र याच 24 तासांत 112 जण दगावले आहेत.
रविवारी नागपूर जिल्ह्यात 18 हजार 629 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण 5007 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागातील 2274 तर ग्रामीण भागातील 2269 रुग्ण नव्याने बाधित झाले आहे. तसेच 112 रुग्णांचा नागपूर जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरी भागात 62, ग्रामीण भागात 36 तर जिल्हाबाहेरील 14 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. यासोबतच आज 6 हजार 376 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रीय रुग्णसंख्येत तिसऱ्या दिवसात घट होऊन 76 हजार 726 वरून 74127 वर पोहोचली आहे.
पूर्व विदर्भात मृत्यूची संख्या 200 पार-
पूर्व विदर्भात 8 हजार 965 हे कोरोनाबाधित मिळून आले असून 10 हजार 989 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात बाधितांच्या तुलनेत 2024 रुग्ण हे अधिकचे बरे झाले आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील मिळून मृत्यूचा आकड्यात रविवारी मोठा स्फोट दिसून आला आहे. मागील 24 तासांत 202 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. यात पॉझिटिव्ह रुग्णाच्या टक्केवारीत घट झाली आहे.