नागपूर - मोबाईलवर आलेल्या इन्स्टंट (कर्ज) लोनच्या जाहिरातीच्या माध्यमातून कर्ज घेणे नागपुरच्या एका २१ वर्षीय तरुणीला भलतेच महागात पडले आहे. लोन देण्याच्या बहाण्याने त्या तरुणीच्या मोबाईलमधील सर्व फोटो काढून घेण्यात आले. त्यानंतर तिच्याकडून वेळोवेळी तिचे फोटो वायरल करण्याची धमकी देऊन हजारो रुपये उकळण्यात आले. रोज-रोजच्या धमक्यांना त्रासून त्या तरुणींनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा या प्रकरणाचे धागेदोरे चीन पर्यत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी कैफ इब्राहिम सय्यद (कऱ्हाड) आणि इरशाद इस्माईल शेख (पुणे) विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
७ हजार ८०० रुपयांची मागणी - तक्रारदार तरुणीने जानेवारी महिन्यात आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार अजनी पोलीस ठाण्यात दिली होती. मोबाईल वरील एका लिंकच्या माध्यमातून तिने लोनसाठी अर्ज केला होता. त्यासाठी तिला पॅनकार्ड क्रमांक, फोटो आयडी मागण्यात आला होता. काही वेळातच तिच्या खात्यात १ हजार २०० रुपये जमा करण्यात आले. परंतु त्यानंतर त्या तरुणी ला पैसे द्या नाही तर तुमचे फोटो वायरल करू अशा धमक्या मिळू लागल्या. त्या भीतीने त्या तरुणीने पहिल्यांदा ५ हजार ४०० आणि नंतर ७ हजार ८०० रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यानंतर सुद्धा धमक्या येत असल्याने अखेर त्या तरूणीने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
कॉलगर्ल म्हणून फोटो वायरल करू - केवळ १हजार २०० रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर त्या तरुणीला अनेक वेळा पैशांची मागणी करण्यात आली. पैसे दिले नाही तर तुमचे फोटो कॉलगर्ल म्हणून वायरल करू अशी धमकी देण्यात आली होती.