नागपूर - ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणानंतर आजपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमे अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात 248 ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यानुसार आज प्रत्येक केंद्रांवर लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. यामध्ये नागपूर शहरातील ८६ लसीकरण केंद्रांवर तर जिल्ह्यातील १६६ लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. नागरिकांमध्ये देखील प्रचंड उत्साह दिसून येत आहे. लसीकरणच्या मोहिमेचा आढावा आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन घेतला. त्यावेळी नागरिक आणि लसीकरण केंद्र प्रमुखांशी संवाद साधला आहे.
गेल्या काळात झालेल्या चुका आरोग्य यंत्रणेकडून सुधारण्यात आल्या आहेत. आजपासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्यातील लसीकरण मोहीम अगदी सुरळीत रित्या पार पडली आहे. लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना टोकन देण्यात आल्याने केंद्रांवर होणारी गर्दी देखील मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे बघायला मिळत आहे. यावर लस घेतलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मागील टप्यांमध्ये नागपुरात २ लाख १८ हजार ५२८ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. त्यांना दुसरा डोस द्यायला देखील सुरुवात झाली आहे. मात्र, आता पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर ४५ दिवस करण्यात आल्याने लसीकरण केंद्रांवर आलेल्या नागरिकांना ४५ दिवसानंतर येण्याचा सल्ला देऊन परत घरी पाठवले जात आहे. मात्र ज्यांचे वय ६० पेक्षा जास्त आहे. अशा नागरिकांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्याला प्राधान्य दिले जात आहे.
हेही वाचा - मुंबईत आजपासून दोन सत्रात होणार लसीकरण