नागपूर - विविध मागण्यांसाठी राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपाचे पडसाद नागपूरात दिसायला सुरुवात झाली आहे. मागण्या मान्य न झाल्यास एसटीचे कर्मचारी उद्या (रविवारी) बेमुदत संपावर जाणार आहे. कर्मचाऱ्यांनी नागपूरच्या मुख्य गणेशपेठ आगारात आंदोलन केले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर नागपूर आगारातील एसटीचे कर्मचारी संपावर जाणार असल्याने प्रवाशांच्या मनात धडकी भरली आहे. बसेसची संख्या कमी असल्याने सर्वसामान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. रविवारपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रवाशांना गावोगावी जाण्यासाठी इतर ठिकाणी व्यवस्था करावी लागणार आहेत. त्यातही खासगी ट्रॅव्हलकडून गरीब प्रवाशांची पिळवणूक केली जाईल अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपची साथ
नागपूर शहरातील गणेशपेठ आगारात सुरू असलेल्या आंदोलनात भाजप आमदार प्रवीण दटके, गिरीश व्यास आपल्या समर्थकांसह सहभागी झाले होते. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आपला पाठिंबा दिला आहे. यावेळी आंदोलकांनी भाजपच्या मदतीने ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
उधळपट्टी करायला पैसे आहेत, कर्मचाऱ्यांसाठी का नाहीत - दटके
राज्य सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळावे या मागणीसाठी 4 दिवसांपासून नागपुरच्या गणेशपेठ आगारात कर्मचारी आंदोलन करत आहे. राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, सर्वच मागण्या मान्य करा, असे कर्मचारी संघटना सांगत आहेत. राज्य सरकारकडे बंगले दुरुस्त करण्यासाठी पैसे आहेत. गाडी घेण्यासाठी पैसे आहेत. मग एसटी कर्मचाऱ्यांकरिता का नाहीत असा प्रश्न आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित केला आहे. सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध म्हणून आंदोलनात सहभागी झाल्याचं आमदार दटके यांनी सांगितलं.