नागपूर - सामान्य नागरिकांच्या हक्काची वाहिनी म्हणून ओळख असलेली लालपरी आता पुन्हा सुसाट धावायला लागली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) संपकरी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर नागपूर आगारातील 1428 संपकरी कर्मचारी कामावर परतले आहेत. अनेक कर्मचारी आधीच कामावर परतल्याने आता एकूण अठराशे कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे सर्व फेऱ्या सुरू करण्याची तयारी राज्य परिवहन मंडळाच्या नागपूर मंडळाने केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण अठराशे कर्मचारी कार्यरत आहेत. पाच महिन्यांपूर्वी सर्व कर्मचारी विलगीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक कर्मचारी कामावर परत आले. मात्र त्यांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे एसटीची सेवा काही प्रमाणात सुरू झाली. मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूर विभागात सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे विभागातील 390 बस रस्त्यावर नियमितपणे धावू लागल्या आहेत. संप मिटल्यानंतर 1274 फेऱ्या आठ आगरातून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 52 हजारांवर पोहोचली आहे.
काय आहे नागपुरातील आगार निहाय स्थिती - नागपूर जिल्हात एकूण 8 आगार आहेत, त्यापैकी गणेशपेठ आगार सर्वात मोठा आणि व्यस्त आगार आहे. गणेशपेठ आगारात 81 बस असून त्यांच्या 221 फेऱ्या सुरू झाल्या आहेत. इमामवाडा आगारात 47 बस आहेत. त्यांच्या सुद्धा 260 फेऱ्या सुरू झाल्या आहेत. घाट रोड आगारात 57 बस असून एसटीच्या 297 फेऱ्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात उमरेड बस आगारात 37 बस उपलब्ध असून त्यांच्या देखील 320 फेऱ्या धावायला लागल्या आहेत.
बस दुरुस्तीचे काम सुरू - नादुरुस्त बस दुरुस्त करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू झाले आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर नागपूर विभागात एकूण 25 ते 30 बस नादुरुस्त झाल्या आहेत. तर अनेकांच्या बॅटरी खराब झाल्या आहेत. या सर्व बस सुरू करण्यासाठी यांत्रिक आणि तांत्रिक विभागाचे कर्मचारी कामाला लागले आहेत.
वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्याने आंदोलनाला बसली खीळ - न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर मुंबईत आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी परतीची वाट धरली. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर हल्ला झाला. त्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठी खीळ बसली आहे.