नागपूर - १ मे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली अस्मितेचा स्थापना दिवस. याच दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस देखील असतो. मात्र, संचारबंदीच्या या कठीण काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या उद्योगांमध्ये काम करणारा कामगारावर एकवेळच्या अन्नाची भ्रांत झालीय.
लॉकडाऊनमुळे सध्या अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व उत्पादने ठप्प झाल्याने कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाला पुन्हा आर्थिक मोर्च्यावर सक्षमपणे उभे करायचे असल्यास कामगारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण संचारबंदीची घोषणा होताच औद्योगिक आस्थापनांनी कामगारांना वाऱ्यावर सोडल्याची परिस्थिती नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात आहे. नागपुरात हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर हे प्रमुख औद्योगिक क्षेत्र विकसित झाले आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यात अनेक लहान औद्योगिक वसाहती आहेत. यांमध्ये अनेक लघू, मध्यम प्रकल्पांसह काही मोठे प्रकल्पही आहेत.
जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या हिंगणा एमआयडीसीत जवळपास १३०० लहान-मोठे उद्योग आहेत. ३० ते ४० हजार कर्मचारी यामध्ये काम करतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या दीड महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांतर्गत सर्व औद्योगिक आस्थापने बंद आहेत. यामुळे हजारो कुशल कामगार बेरोजगार झाले आहेत. जवळपास १५ हजार कुशल कामगार प्रसिद्ध उद्योग समूहांचे कर्मचारी आहेत. यामध्ये महिन्द्रा अँड महिन्द्रा, प्लास्टो सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच २० हजार कंत्राटी कामगारांच्या हाताला सुद्धा आजवर इथेच रोजगार मिळालाय. यामध्ये ४० टक्के स्थानिक कामगार असले, तरीही ६० टक्के कामगार परराज्यातील आहेत.
आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या शेजारच्या राज्यातील कामगारांनी गावी जाण्याचे प्रयत्न केले. मात्र परिवहन व्यवस्थाच उपलब्ध नसल्याने ते सर्व नागपुरात अडकले आहेत. तसेच उत्तरप्रदेश, राजस्थान आणि ओडिशा यांसारख्या राज्यातील कामगारां समोर कोणताही पर्याय नसल्याने ते कारखाने सुरू होण्याच्या अपेक्षेने एक-एक दिवस ढकलत आहेत.
बहुतांश औद्योगिक आस्थापनांनी कामगारांना पगार देखील दिलेला नाही. ज्यामुळे या कामगारांना जगणे सुद्धा असह्य झाले आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या कर्मचाऱ्यांनी एकाच कंपनीमध्ये काम करताना आयुष्य खर्ची घातले, त्या कंपनीच्या संचालक मंडळांनी सुद्धा असंवेदनशीलतेचा परिचय दिला.
नागपुरातील औद्योगिक वसाहतींमध्ये हजारोंच्या संख्येने कंत्राटी कामगार काम करतात. त्यामुळे सध्या सुरू असलेली स्थिती अधिक काळापर्यंत सुरू राहिल्यास या कामगारांवर मोठे आर्थिक संकट ओढवणार आहे. तर येणाऱ्या काळात औद्योगिक क्षेत्राला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. राज्यातील ही स्थिती बघता सरकारने सर्व औद्योगिक आस्थापनांच्या व्यवस्थापनासाठी कामगारांना किमान वेतन लागू करावे, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, एकीकडे व्यवसाय बंद असल्याने व ही परिस्थिती आणखी पुढे सुरू राहिल्यास संबंधित आस्थापना किती दिवस हे करू शकतात, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.