नागपूर - केवळ एक मिनिट आणि ५१ सेकंदात तब्बल १०२ पायऱ्या चढणारे अनेक जण असतील, मात्र चक्रासनात ही क्रिया पार पडणारा एक अवलिया आहे.
सहा वर्षांचा राघव साहिल भांगडे या विद्यार्थ्याने हे शक्य करून दाखवलं आहे. विशेष म्हणजे हे करणारा तो देशात एकमेव आहे. राघवच्या या कलेमुळे त्याची नोंद भविष्यात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉड मध्ये होईल, असा विश्वास स्वतः राघवसह त्याचे कोच आणि कुटुंबातील सदस्यांना आहे.
राघव साहिल भांगडे या चिमुकल्याला आता नागपूरकर 'वंडर बॉय' म्हणून देखील ओळखू लागले आहेत. राघव हा शहरातील नामांकित शाळेचा विद्यार्थी आहे. तो अवघ्या अडीच वर्षांचा असताना त्याची लवचिकता ओळखून वडिलांनी त्याला योगा व कराटेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यासाठी विविध ठिकाणी प्रशिक्षण वर्ग देखील सुरू करण्यात आले. यमुळे राघवाचा प्रवास सुरू झाला. राघव हा केवळ चक्रासन क्रिया करण्यातच निपुण नाही, तर त्याने कराटेमध्ये देखील प्राविण्य मिळवलं आहे.
राघव सकाळी लवकर उठून सरावाची सुरुवात करतो. त्याचे प्रशिक्षक विजय गिजारे हे देखील विशेष लक्ष देऊन त्याच्याकडून सर्व सराव करून घेतात. यामुळेच तो चक्रासन क्रियेत पारंगत झाला आहे. सामान्य व्यक्तीला १०० पायऱ्या चढल्यानंतर धाप लागेल. मात्र राघव चक्रासन क्रियेत शंभर पेक्षा जास्त पायऱ्या इतक्या सहजतेने चढतो की, या वर कुणाला विश्वासच बसत नाही. राघवच्या वडिलांनी व प्रशिक्षकांनी अल्पावधितच त्याच्यातील विशेष गुण ओळखून मेहनत घेणे सुरू केले. त्यामुळे आज राघव कराटे आणि योगा या दोन्ही प्रकारात निपुण झाला आहे. चक्रासन क्रिया करताना राघवने हळूहळू वेग वाढवला. मात्र आज तो केवळ १ मिनिट ५१ सेकंदांमध्ये १०२ पायऱ्या सर करू शकतो.
या पूर्वी राघवने केवळ एक मिनिटात १२५ टाईल्स फोडल्या होत्या
गेल्या वर्षी नागपूरला झालेल्या एका स्पर्धेत वंडर बॉय राघव याने केवळ एक मिनिटात तब्बल १२५ टाईल्स फोडण्याचा विक्रम केला होता. एखादं उद्धिष्ट सध्या करायचं असेल तर त्यासाठी निरंतर सराव, सातत्य आणि प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते, चिमुकल्या राघव ने देखील याच सूत्राचे पालन करत आज यशाची उंची गाठली आहे.
राघवच्या अंगातील गुण म्हणजे 'गिफ्ट'
राघव हा अगदी अडीच वर्षांचा असताना त्याला त्याच्या वडिलांनी विजय गिजारे यांच्या अकादमीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र त्याचे वय बघता विजय सरांनी प्रवेश नाकारला होता. त्यानंतर राघव निराश झाला नाही. तर तो सलग महिनाभर विजय सरांच्या अकादमीबाहेर थांबून इतरांचा सराव बघत राहिला. त्यानंतर मात्र विजय सरांना त्याला अकादमीत प्रवेश द्यावा लागला होता. आज राघव त्यांचा सर्वात गुणी विद्यार्थी म्हणून पुढे आला आहे. त्याच्या वडिलांना तर राघवच्या अंगी दैवी शक्ती असल्याचं वाटतं.