नागपूर - वृद्ध आईची हत्या केल्यानंतर मुलाने विषारी औषध पित आत्महत्या (Son dies by suicide after killing mother) केल्याची घटना नागपूर शहराच्या धंतोली पोलीस ठाण्याच्या (Dhantoli Police Station Nagpur) हद्दीतील हिंदुस्थान कॉलनीत घडली आहे. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वीची असावी असा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. लीला विष्णू चोपडे (७८) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे, तर श्रीनिवास विष्णू चोपडे (५१) असे आरोपी मुलाचे नाव आहे. मुलगा हा इंजिनिअर असून, तो बेरोजगार होता, तो आईसोबत राहायचा. त्याने आईची हत्या कोणत्या कारणाने केली या बाबत खुलासा होऊ शकला नाही.
लीला चोपडे यांच्या मालकीचा मोठा बंगला हिंदुस्थान कॉलनीत आहे. या बंगल्यात त्या श्रीनिवास सोबत राहत होत्या. श्रीनिवास बेरोजगार असल्याने लीला चोपडे यांना मिळत असलेल्या पेन्शनमधून त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. गेल्या तीन दिवसांपासून लीला यांची मुंबईला राहणारी मोठी मुलगी आणि भावाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, फोन कुणीही घेत नसल्याने त्यांनी एका नातेवाईकाला घरी जाण्यास सांगितले.
दार तोडून पोलिसांनी केला घरात प्रवेश - चोपडे यांचे घर आतून बंद असल्याने पोलिसांना या बाबत सूचना देण्यात आली. पोलिसांनी लीला चोपडे यांच्या घराचे दार तोडले तेव्हा लीला आणि त्यांचा मुलगा श्रीनिवास मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा वृद्ध लीला यांच्या अंगावर चाकूने भोकसल्याचे घाव दिसून आले, तर मुलाच्या मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली आढळून आली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवले असून, तपास सुरू केला आहे.