नागपूर - कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्यांचे 'सोबत' पालकत्व स्वीकारणार असल्याची घोषणा माजी महापौर आणि सिद्धिविनायक संस्थेचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी केली आहे. सोबत या नावावे हा उपक्रम राबविला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्या पाच कुटुंबाचे पालकत्व घेतले जाईल, त्यानंतर संपूर्ण नागपूर शहर आणि जिल्ह्यात पालकत्व मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
कोरोना या जागतिक महामारीने गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत अशा सर्वांचेच हाल केले आहेत. अनेक कुटुंबे या महामारीने उद्ध्वस्त झाले आहेत. घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने अनेक कुटुंबांवर आभाळ कोसळले आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले आई वडील गमावले आहेत, ज्यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे आई-वडील अथवा घरातील कर्ता व्यक्ती गमावल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व 'सोबत' संस्थेकडून स्वीकारण्यात येणार आहे. अशा मुलांची शिक्षणाची व्यवस्था, आरोग्याची सोय, आहार, कौशल्य प्रशिक्षण आणि समुपदेशन देखील केलं जाणार आहे.
सुरुवातीला पाच जणांचे पालकत्व स्वीकारणार
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धिविनायक ट्रस्टकडून 'सोबत' ही संकल्पना राबवली जात आहे. या माध्यमातून जवळपास पाच ते सात हजार अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्यात येणार आहे. सुरुवातीला पाच कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले जाईल. यामध्ये देशातील प्रसिद्ध बुद्धिबळ खेळाडू आणि प्रशिक्षक स्व. उमेश पाणबुडे यांच्या कुटुंबाचा समावेश आहे. स्वर्गीय संघपाल लोखंडे यांचे कुटुंब तसेच इंडिगो कंपनीमध्ये टेम्पररी मेकॅनिक असलेले स्व. रामू भोयर, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले स्व. सुधीर सावरकर यासह टॅक्सीचा व्यवसाय करणारे स्व. तुषार ठाकरे यांच्या कुटुंबांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा - एकाला फसवले, दुसऱ्याला फसवायला निघाली अन् पकडली गेली