नागपूर - काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला मुन्ना भाई एमबीबीएस या हिंदी चित्रपटात ज्या पद्धतीने मुन्ना भाई परिक्षेत अत्याधुनिक पद्धतीने चिटिंग करून एमबीबीएसच्या प्रवेश परीक्षेत अव्वल येतो. त्याच पद्धतीचा अवलंब करत काही महाभागांनी गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात आलेल्या कनिष्ठ लिपीक पदाच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले होते. आरोपींनी अतिशय फुल प्रूफ प्लॅन तयार करून तो अंमलात आणला होता, मात्र पोलिसांच्या नजरेतून आरोपींचे कृत्य सुटले नाही.
नागपूर शहरातील बजाज नगर पोलिसांनी शासनाच्या विभिन्न विभागाद्वारे घेण्यात येणाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये बनावट उमेदवार बसवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर सोडविणारे टोळीचा छडा लावत सहा आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी इंद्रजीत केशव बोरकर (२९, यवतमाळ), हंसराज मोहन राठोड (६२) वर्षे राहणार दिग्रस यवतमाळ, केषव बोरकर (६०), प्रेमसिंग रामसिंग राजपुत (२९, सिडको औरंगाबाद), प्रतापसिंग धोंडीराम दुल्हट (२५, जालना), पुनमसिंग हरसिंग सुंदरडे (३४, औरंगाबाद) यांचा समावेश आहे. आरोपींनी कशा प्रकारे हे संपूर्ण रॅकेट क्रियान्वित केले याची माहिती पोलीस उपायुक्त नेरुल हसन यांनी दिली
या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, महाराष्ट्र शासनातर्फे सहकार, पणन व वस्त्र उद्योग विभाग यांचे वतीने विभागीय सह निबंधक सहकारी संस्था ( लेखा परिक्षक ) द्वारा घेण्यात आलेल्या कनिष्ठ लिपीक या पदाकरिता ४२५ व उपलेखा परीक्षक या पदाकरीता १०६ उमेदवारांचे परिक्षेचे आयोजन २३ फेब्रुवारी २०२० रोजी डॉ . आंबेडकर महाविद्यालय दिक्षाभूमी नागपूर येथे करण्यात आले होते. या परीक्षेकरीता आरोपी इंद्रजीत केशव बोरकर हा अधिकृत उमेदवार होता. परीक्षा झाल्यानंतर काही महिन्यात निकाल लागला. ज्यामध्ये आरोपी इंद्रजित याने सर्वाधिक १७८ गुण प्राप्त करून परीक्षा उत्तीर्ण केली होती. म्हणून त्याला मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार इंद्रजित हा त्याची मूळ कागदपत्रे घेऊन हजर झाला. त्यावेळी संबंधित विभागास त्याने लेखी परीक्षेच्या हजेरीपटावरील केलेली स्वाक्षरी व त्याची मुळ स्वाक्षरी यात तफावत दिसून आली. म्हणून संबंधीत विभागाने लेखी परीक्षेची केलेली व्हिडिओ शुटींगची पडताळणी केली असता इंद्रजीत बोरकर यांचे ऐवजी दुसऱ्या व्यक्तीने परीक्षा दिल्याचे लक्षात आले. त्यावरून संबंधीत विभागाने आरोपी कइंद्रजित बोरकर याचेकडे केलेल्या चौकशीत तो स्वत : परीक्षेला बसला नसल्याचे व लेखी परीक्षेचा पेपर सोडविला नसल्याचे लेखी स्वरूपात कबुल केले. त्यानंतर या संदर्भात बजाज नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अतिशय नियोजन बद्ध पद्धतीने तपास करून मुख्य आरोपीसह सहा आरोपींना अटक केली आहे.
अशी करायचे कॉपी -
परीक्षेला बसलेल्या डमी उमेदवाराने एक बारीक ब्लुटूथ कानात बसवले होते. शिवाय एक मोबाईल फोनच्या स्पाई कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रश्न पत्रिकेचे फोटो सबंधित मेलवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर दुसरीकडे असलेल्या आरोपींनी फोन कॉलच्या माध्यमातून सर्व उत्तरे त्या डमी परीक्षार्थीला कळवले. त्याने मायक्रो ब्लुटूथ कानात बसवले असल्याने या संदर्भात कुणालाही शंका आली नाही. त्यानंतर आलेल्या निकालात तो डमी उमेदवार अव्वल आला, मात्र प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी त्याचं बिंग फुटल्याने मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे.