नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याचा दौरा रद्द केला आहे. २० नोव्हेंबरला त्यांची मुंबई येथे अतिशय महत्त्वाची बैठक असल्याने त्यांनी विदर्भ दौऱ्याला कात्री लावल्याचे कारण पुढे आले आहे. आज ते गडचिरोली आणि चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. ते पुढे यवतमाळ आणि वर्धा येथे जाणार होते. मात्र, आता त्यांचा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
म्हणून दौरा सोडला अर्धवट -
शरद पवार हे कालपासून विदर्भाच्या दौर्यावर आहेत. बुधवारपासून त्यांच्या विदर्भ दौऱ्याला नागपूरपासून सुरुवात झाली आहे. काल नागपूर येथे विविध कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते आज सकाळीच गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. स्वतः शरद पवार येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला होता. मात्र, ऐनवेळी शरद पवार यांनी वर्धा आणि यवतमाळ दौरा रद्द केला. सुरवातीला तब्येतीच्या कारणाने दौऱ्याला कात्री लावल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, २० नोव्हेंबरला मुंबई येथे अतिशय महत्त्वाची बैठक असल्याने त्यांनी दौरा आटोपता घेतला असल्याचे कारण पुढे आले आहे.
असा होता निर्धारित दौरा -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याला (१७ नोव्हेंबर) पासून सुरुवात झाली आहे. पहिला दिवस (बुधवारी) ते नागपूर शहरात विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. त्यांनतर गुरुवारी सकाळी नागपूर वरून मोटारीने गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे, दुपारी गडचिरोली येथे, तर संध्याकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे जाणार होते. गुरुवारी चंद्रपूर येथे मुक्काम करत डॉक्टर, वकील आणि उद्योगपतींसोबत बैठक घेणार होते. याशिवाय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी होणार होते. तेथूनच ते यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याचा दौरा करणार होते.
हेही वाचा - Sharad Pawar Vidarbha Visit : अनिल देशमुखांच्या कोठडीची किंमत मोजावी लागेल - शरद पवार