नागपूर - एका वाहन चालकास सिव्हिल लाईन परिसरात गुरुवार रात्री रस्ता ओलांडताना बिबट्या दिसला. यानंतर तात्काळ सर्चिंग करण्यासाठी पोहचलेल्या वन कर्मचाऱ्यांस त्याचे कॉलिंग (ओरडण्याचा आवाज) ऐकल्याचे वन विभागकडून स्पष्ट करण्यात आले. पण बिबट्याचा मागोवा घेऊन फायदा होत नसल्याने त्याचा पुढचा संभाव्य प्रवास शोधण्याचे काम वनविभागाकडून केले जात आहे. यात त्याने नाल्यावाटेचा रस्ता बदलल्याची शक्यता वर्तवली जात असून पुढील संभाव्य शक्यता तपासण्याचे काम केले जात आहे.
नागपुरात मागील आठ दिवसांपासून बिबट्या शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमधून शहरातील विविध भागात संचार करत असल्याचं पुढे येत आहे. यात बुधवारी रात्री कॉलिंग झालेल्या परिसरात काहीच आढळून न आल्याने गुरुवारी सकाळी त्याच परिसराच्या अवती भवती जुने उच्च न्यायालय आयुक्त कार्यलय परिसरात शोध मोहीम झाली. पण पगमार्क दिसून आले नाही. हा परिसर पाहता झाडांची संख्या अधिक आहे, यामुळे त्याला लपण्यासाठी खूप जागा मिळत असल्याचे बोलले जात आहे. पण नाल्यातून जात असल्याने पगमार्क किंवा पुढचा प्रवास शोधण्यास अडचण जाणत आहे. दुसरे म्हणजे तो मागे येण्याऐवजी पुढे सरकत चालला आहे.
वन विभागाचे एक पाऊल पुढे विचार करून नियोजन..
बिबट्याने प्रवासात एक-दोन ठिकाणी रस्ता ओलांडल्याची शक्यता लक्षात घेऊन बहुतांश वेळा तो नाल्यानेच पूढे सरकत गेला आहे. यात बिबटचा प्रवास बायोडायव्हरसिटीकडून आल्याचा अंदाज असून गायत्री नगर, आयटी पार्क, पीडिकेव्ही परिसर, महाराज बाग, आणि त्यानंतर सिव्हिल लाईन परिसरात पोहचला आहे. यापुढे तो त्याचा नाल्याने प्रवास केल्यास कुठे जाऊ शकेल याचा अंदाज घेऊन तिरपुडे कॉलेज, ऊर्जा विभागाचे विश्रामगृह पर्यंतचा नाल्याची कनेक्टिव्हिटीचा अंदाज घेऊन पाहणी करण्याचे काम आज उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांनी पाहणी केल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक सुरेंद्र काळे यांनी दिली.
पुढच्या रस्त्याची शक्यता शोधत काम सुरू..
सध्याचा प्रवास ज्या नाल्यातून झाला तो त्याच नाल्याने मागे फिरून परत जाईल अशी शंका होती. पण आता त्याने रस्ता बदलला आहे. यामुळे पुढील अंदाज घेऊन पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. यात पुढच्या भागात ट्रॅप कॅमेरे आणि त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे. वन विभागाकडून यावरच काम करण्यात आल्याची माहिती वन्य जीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांनी दिली आहे. यासोबतच पुढे गेल्यास तो एकतर राज्यपालांच्या राज भवन जिथे नाला संपतो त्या भागात जाऊ शकेल, किंवा दुसऱ्या बाजूने गेल्यास तेलंगखेडी भागात बॉटनिकल गार्डन होत गोरेवाडा संपल्याच्या दिशेने जाईल अशी शक्यता म्हणून सर्व अंगांनी विचार केला जात आहे. यामुळे यात काय होईल याकडे लक्ष लागले आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे पण अफवा पसरू नये..
शहरात बिबट्या असल्याची चर्चा असल्याने अनेक जण इथे दिसला तिथे दिसला, अशी अफवा पसरवत आहे. जीपीओ चौक सह उच्च न्यायालय परिसरात दिसल्याची अफवा तपासली असता एक ठिकाणी कुत्रा आणि मांजर पाहून चर्चा झाल्याचे पुढे आले. यामुळे अफवेला बळी न पडता खात्री करूनच माहिती द्या, असे आवाहन वन विभागकडून केले जात आहे.