जळगाव - काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या वर्षी कापूस बीटी बियाणे विक्री १ मे पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला हाेता, परंतू कृषी विभागाने पुन्हा बियाणे विक्रीवर १ जूनपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे आता बाजारात बाेगस बियाण्याचा काळाबाजार हाेण्याची शक्यता वाढली आहे. कापसावरील गुलाबी बोंडअळीचा धाेका वाढल्यामुळे कापसाच्या पूर्व हंगामी लागवडीला कृषी विभागाने परवानगी नाकारली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी गेल्या दाेन वर्षापासून बियाणे विक्रीला १ जूनपर्यंत विक्री नाकारण्यात येते. यंदा मात्र, शासनाने बाजारातील गर्दी टाळण्यासाठी १ जून ऐवजी १ मे पासून विक्रीला परवानगी दिली हाेती. मात्र, ही बंदी कायम ठेवण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.
बाजारात पूर्णपणे बीटी बियाण्याची विक्री थांबवण्यात आली आहे. यावर्षी पाणी मुबलक असल्याने जिल्ह्यात जवळपास १ लाख हेक्टरवर शेतकरी पूर्वहंगामी कापूस लागवडीच्या तयारी आहेत. राज्यात बियाणे विक्री बंद असली तरी शेजारच्या मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात मात्र बियाणे सर्रास विक्री केले जात आहे. त्यामुळे परराज्यातून जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर बाेगस बियाणे येवू शकते. त्यातून काळाबाजर वाढण्याची शक्यता आहे. २० मे नंतर जिल्ह्यात कापूस लागवडीचा वेग येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकरी बाजारात बियाण्याचा शाेध घेत आहेत.
काळाबाजार राेखण्यासाठी १६ पथक तैनात
जळगाव जिल्ह्यात मोठया प्रमाणात कापूस लागवड केली जाते, याच कारणामुळे शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागकडून १६ पथक तैनात करण्यात आले आहे. राज्यात बियाणे विक्री बंद असली तरी शेजारच्या राज्यातून जिल्ह्यात बोगस बियाणे येऊ शकते याची खबरदारी म्हणून कृषी विभागाकडून जिल्ह्याच्या सीमेवर पथक तैनात करण्यात आले आहे.