नागपूर - काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. नागपूर शहरातील काँग्रेस कार्यकर्ते आजचा दिवस संकल्प दिन म्हणून साजरा करत आहेत. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरच्या सक्करदारा चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी २०२४ मध्ये देशात काँग्रेसचे सरकार येऊन राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान, वाढत्या महागाई विरोधात यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा केली.
'स्मृती इराणी आज गप्प का?'
यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा फोटो सिलेंडरला लावत त्या फोटोला हार घालून वाढत्या महागाईचा निषेध नोंदवण्यात आला. खाद्य तेल, सिलेंडर, इंधनाच्या किमती, हे सगळ्यांचे भाव वाढल्यामुळे आज सर्वसामान्य नागरिकांसमोर आर्थिक आडचणी निर्माण झाल्या आहेत. आज इंधनाचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या काळात महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती इराणी आज गप्प का? असा प्रश्न या कार्यकर्तांनी उपस्थित केला आहे. महागाई कमी करायची असेल तर देशात काँग्रेसची सत्ता येणे आवश्यक आहे. तसेच, राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना २०२४ ला पंतप्रधान करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज नागपूर शहरातही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.