नागपूर - यंदा मान्सून वेळेपूर्वीच येण्याची शक्यता आहे, त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या प्रत्यकाचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. एकदाचा पावसाळा सुरू झाला की शहरातील सकल भागात पाणी साचणे, नागरिकांच्या घरात पाणी घुसणे यासारख्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येतात. शहरातही सर्व नदी, नाल्यांचा गाळ काढण्याचे काम एप्रिल महिन्यात सुरू केले जायचे. मात्र, यावर्षी अजूनही नालेसफाईचे काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्या पूर्वीच्या तयारीला गती देणे आवश्यक आहे. नदी, नाले आणि पावसाळी नाल्यांचे स्वच्छता कार्य लवकरात लवकर पूर्ण होईल याकडे विशेष लक्ष देऊन शहरातील कुठल्याही रस्त्यावर पाणी साचू नये यादृष्टीने उपाय योजनात्मक कार्यवाही करा, असे सक्त निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. ( Nagpur Municipality Commissioner Radhakrishnan B ) यांनी दिले आहेत. मात्र, दिवस कमी असल्याने पावसाळ्या पूर्वीचे काम पूर्ण होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पावसाळ्यात नदी नाल्यात पावसाचे पाणी साचू नये, पाण्याचा प्रवाह सुरळीत रहावा, पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शहरातील सर्वात मोठी नदी असलेली नाग नदीची सफाई करण्यात येत आहे. मात्र, आता दिवस कमी शिल्लक राहिले असल्याने नालेसफाई पूर्ण होईल का हा प्रश्न निर्माण झाला आहे. नाग नदीतील ( Nag River ) तसेच विविध नाल्यांमधील गाळ काढण्यात येत असून यासाठी जेसीबीची मदत घेतल्या जात आहे. नाल्यात वाढलेले गवत, कचरा, गाळ काढण्यात येत असून मान्सूनपूर्व सफाईची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे. शहरात एकूण 58 ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असल्याचं महापालिकेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
पालिका आयुक्तांनी घेतला आढावा - पालिका आयुक्त काही दिवसांपासून पावसाळ्यापूर्वी तयारीच्या कार्याचा आढावा घेत आहेत. पावसाळी नाल्यांची योग्य स्वच्छता करून रस्त्यावर कुठेही पाणी राहणार नाही याची काळजी घेण्याबाबत त्यांनी सूचित केले आहे. पावसाळी नाल्या, सिवेज लाईनच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या स्वच्छता कार्याचा झोननिहाय आढावा त्यांनी घेतला. नदी स्वच्छता कार्य करताना नदीतून काढण्यात आलेला कचरा, गाळ, माती हे सर्व तिथे टाकून राहणार नाही याची काळजी घेऊन त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत. तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेचे काम बहुतांश पूर्ण झालेले असून उर्वरित कामाला गती देउन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
शहरात 227 नाले स्वच्छ करण्याचे आवाहन - नागपूर महानगर पालिकेच्या माहितीनुसार शहरात एकूण 227 नाले आहेत. ज्यांच्या माध्यमातून शहरातील घाण पाणी वाहून नेले जाते. मात्र, पावसाळ्यात हे सर्व नाले जाम होत असल्याने नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरात जात असल्याचा तक्रारी असतात. नाल्यांच्या संदर्भात नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी राहू नये. नागरिकांकडून नाल्यांमध्ये कचरा टाकू नये यादृष्टीन झोन स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील कोणत्याही नाल्यावर अस्वच्छता राहणार नाही, प्लास्टिक, कापड, थर्माकोल अशा वस्तूंमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा - Ward Formation Nagpur : नागपूर महापालिकेत 38 ऐवजी असणार 52 वॉर्ड, नगरसेवकांची संख्याही वाढणार