नागपूर - पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेला दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. मात्र, हा हल्ला होणार असल्याची माहिती सरकारला आधीच होती. याबाबतचा खुलासा आरएसएसचे सरसंघचालक डॉ. भागवत यांनी करावा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवरून प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पुलवामा हल्ल्यापूर्वी गुप्तचरांनी दिलेल्या अलर्टचे पत्र आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत दाखविले.
सरकारने पुलवामा हल्ल्याबाबत केंद्रीय मंत्रमंडळाची बैठक बोलावली का? संरक्षण विभागाची बैठक घेतली का? घेतली असेल, तर कुठल्या उपाययोजना केल्या? मिळालेल्या गुप्त माहितीकडे सरकारने दुर्लक्ष का केले? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.
पुढे आंबेडकर म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वांचे उत्तर देणार नाहीत. नितीन गडकरी हे पंतप्रधानानंतर भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात. तसेच ते पंतप्रधानाचे दावेदारदेखील आहेत. त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारत आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. पुलवामा येथील हल्ला व त्यानंतर करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईकबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला.