नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार बुधवारपासून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलीस यंत्रणा बंदोबस्त, नाकेबंदी आणि बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याच्या कामाला लागली आहे. नागपूर शहरात ६० ठिकाणी पोलीस चौक्या तयार करून नाकेबंदी सुरू करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. त्यानुसार नाकेबंदी चौक्यांवर कशा प्रकारची कारवाई केली जात आहे, याचा घटनास्थळावरील आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धंनजय टिपले यांनी..
संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे. त्यानुसार पोलीस कर्मचारी नाकाबंदी ठिकाणांवर तैनात झाले आहेत. जागोजागी उभारण्यात आलेल्या नाक्यांवर प्रत्येकाची चौकशी केली जात आहे. योग्य कारण असेल त्यांनाच पुढे जाऊ दिले जात आहे. शहरात अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने थोड्या प्रमाणात वाहने रस्त्यांवर आहेत. मात्र, आज संचारबंदीचा पहिला दिवस असल्याने शहरातील रस्त्यांवर गर्दी कमी झाल्याचे सुखद चित्र आहे.
रात्रीची गस्त वाढवली
काल रात्रीपासूनच नागपूर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. दिवसा पोलीस रस्त्यांवर सक्रिय असतात, मात्र रात्री संचारबंदी दरम्यान बंदोबस्त नसतो, त्यामुळे नागरिक बाहेर पडत असल्याचे मागील काळात निदर्शनात आल्याने पोलिसांनी रात्रीचीसुद्धा गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.