नागपूर - अवैध धंदे, गुन्हेगारांशी संबंध आणि कामचुकारपणा करणे नागपुरातील पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी 17 कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. एकाच वेळी इतक्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ही पहिलीच कारवाई आहे. दरम्यान आणखी यादी तयार असल्याने काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काही उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांचे प्रत्येक काम पारदर्शक असावे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे पोलिसिंग करताना कर्तव्यात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबतच सट्टा व्यापाऱ्यांशी साटेलोटे असणारे, क्रिकेट बुकी आणि अवैध धंद्यावाल्यांशी मधूर संबंध निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
आणखी यादी तयार असल्याने धाबे दणाणले- पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी एकाच वेळी सतरा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. आणखी काही कर्मचाऱ्यांची यादी तयार असल्याची चर्चा पोलीस विभागात असल्याने कर्तव्याशी बईमानी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.