नागपूर - गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे टप्पे गाठणाऱ्या महामेट्रो नागपूरने आणखी एक मजल मारली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) संस्थेतर्फे प्लॅटिनम श्रेणी हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे. हे स्टेशन पर्यावरण पूरक असून, इतर स्टेशनच्या तुलनेत हे स्टेशन सर्व सुविधांनी युक्त असल्यामुळे प्लॅटिनम दर्जा देण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
अत्याधुनिक सुविधांनी युक्त 'एल' आकाराचे सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन पाच मजली जंक्शन असून, पहिल्या मजल्यावर तिकीट काउंटर, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो गाड्यांसाठी प्लॅटफार्म व्यवस्था आहे. तसेच या ठिकाणी ऑपरेशन सेंटर असून या ठिकाणावरून गाड्यांचे नियंत्रण होते. या ठिकाणाहून सध्या स्थितीत पश्चिम आणि दक्षिण दिशेने मेट्रो जात असून लवकरच पूर्व आणि उत्तर दिशेने मेट्रोचा प्रवास नागरिकांकरिता उपलब्ध होईल. संपूर्ण प्रकल्प पर्यावरण पूरक असावा ही संकल्पना महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांची होती. म्हणूनच या स्टेशनला प्लॅटिनम दर्जा देण्यात आला आहे.
स्टेशनमध्ये सौर उर्जेचा वापर
सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट म्हणजे सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात केलेला वापर. २०० केडब्लूपी क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली इथे उभारण्यात आली आहे. या सौर उर्जा प्रकल्पातून जवळपास स्टेशसाठी लागणाऱ्या 50 टक्के विजेची गरज भागवली जाते.