नागपूर - कोविड लसीकरण मोहिमेला पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद दिसून आला आहे. यात तिसऱ्या दिवशी नागपूर विभागातही टक्केवारी समाधानकारक असल्याचे पुढे आले आहे. बुधवारी 75 टक्के उद्दिष्ट् पूर्ती झाली असून मंगळवारच्या टक्केवारीच्या तुलनेत 25 टक्के वाढ दिसून आली.
पूर्व विदर्भात आठवडयातून चार दिवस लसीकरण होत आहे. पहिल्या दिवशी काही लोकांना त्रास झाल्याचे लक्षणे दिसून आले. याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून आला. लोक लसीकरण मोहिमेला घाबरल्याचे चित्र निर्माण झाले. यामुळे मंगळवारी केवळ 49 टक्केच आरोग्य सेवकांनी लसीकरणाच्या मोहिमेत सहभाग घेतला. यानंतर बुधवारी यात वाढ झाली.
लसीकरणाच्या बाबतीत भीती कायम-
प्रत्यके सेंटरवर फक्त 100 लसीच प्रतिदिवसाला दिले जाणार आहेत. ही व्हॅक्सिन पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कोरोना योध्यांना दिली जात आहे. ही व्हॅक्सिन पूर्व संमती घेऊन तश्या अटी शर्तीचे पालन करून दिली जात आहे. कोणालाही सक्ती नाही. पण या बद्दल भीती असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिक्षकांनी घेतली लस-
आज तिसऱ्या दिवशी मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ अविनाश गावंडे, अधिष्ठाता सजल मित्रा यांच्या पत्नी प्रोफेसर डॉ. आरती मित्रा, डॉ. संदीप भेलकर, डॉ संजय कुकडे यांनीही लसीकरण करून घेतले. यावेळी डॉ गावंडे यांनी इतरांनी सुद्धा लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. शंकेचे निरासरण करून त्यांना प्रोत्साहन देऊ तसेच सर्वांनीच खासकरून आरोग्य सेवकांनी लसीकरण करून घ्यावे, असेही ते म्हणाले.
सकारात्मक दृष्टीकोन वाढला-
लस घेतल्यानंतर मनातून कोरोना होण्याची जी भीती आहे. ती कमी झाली आहे. कोरोनाच्या काळात आहोरात्र काम करताना मागिल काही महिन्यांपासून सतत काळजी आणि भीती मनात आहे. मात्र आता व्हॅक्सिन घेतल्यानंतर कुठेतरी भीती निघून सकारात्मक चित्र दिसून येत आहे.
यात भंडारा जिल्ह्यात 241 जणांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात 432 जणांनी लस टोचून घेतली. गडचिरोलीत 185 गोंदियात 223, नागपूर 921, वर्ध्यात 543 जणांना लसिकरण मोहिमेत सहभाग घेतला. मंगळवारी 3400 जणांचे उद्दिष्ट होते. यात 2545 आरोग्य सेवेत असणाऱ्यानी सहभाग घेतला. बुधवारी 17912 जणांनी लसीकरणास पुढाकार घेतला आहे.
हेही वाचा- 'कोरोनावरील लस सुरक्षितच, संकोच बागळू नका'