नागपूर - देशातील अनेक प्रसिद्ध मंदिरे पूर्वीची बौद्ध विहारे आहेत. यासोबतच वारकऱ्यांचे आराध्य असलेले विठ्ठल म्हणजे बुद्धाचे रूप असून, पंढरपूरचे मंदिर पूर्वीचे बौद्ध विहार होते, असा दावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयाचे विचारवंत आणि साहित्यिक डॉ. प्रदीप आगलावे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला. हा दावा करताना ते प्रबोधनकार केशव ठाकरे यांचे 1929 मध्ये लिखित पुस्तक 'देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे' या पुस्तकाचा संदर्भही देतात. यासह अनेक संशोधक आणि अभ्यासक यांनी हे लिहले. संत परंपरेतही विठ्ठल हे बुद्ध अवतार असल्याचा अभंग लिहितात, असाही दावा त्यांनी केला.
हेही वाचा - Anil Bonde : अनिल बोंडेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले, "ओबीसीच्या कटकारस्थानामागे..."
आंध्रप्रदेशमधील बालाजी मंदिर असो, ओरिसा मधील जगन्नाथ पुरीचे मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, तामिळनाडूचे कांचीपुरम ही मंदिरे पूर्वी विहार होती. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. संत तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाबाई यांच्या अभंगात लिहले आहे की बुद्ध हे विठ्ठलाचे रूप आहे. प्रबोधनकार यांनीही लिहले, बाबासाहेब आंबडेकर यांनीही सिद्ध करणार, असे म्हटले होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले आहे की, अनेक ठिकाणी बौद्ध विहारातील वास्तूंचा आणि बौद्ध मूर्तीचा उच्छेद केला आणि त्या ठिकाणी शंकराच्या मूर्तीची स्थापना केली. अशा पद्धतीने विहारांचे रुपांतर मंदिरांमध्ये झाले. यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1954 मध्ये देहू येथे झालेल्या सभेत घोषणाही केली होती की मी हे सिद्ध करणार मंदिर नसून विहार होते, असा दावा डॉ. आगलावे करतात.
आधी वैदिक धर्म किंवा ब्राह्मणी धर्मात मंदिर परंपरा नव्हती. त्यानंतर सातव्या शतकानंतर मंदिर निर्माण झाले. या संदर्भात अनेकांनी संशोधन केले. यात अनेक मंदिरांमध्ये असलेल्या खांबांवर बुद्धांची मूर्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे. कांचीपुरम येथे पाली अभ्यासाचे विद्यापीठ होते. विहारातून मोठ मोठाली विद्यापीठ निर्माण झाली म्हणून भारतीय संस्कृती महान आहे, असे म्हटले जाते. न्यायालयात जाणार नाही. लोकांना हे सगळे कळावे यासाठीच मी हे मांडले आहे आणि हे मी आज मांडले नसून अनेक अभ्यासकांनी, संशोधकांनी सुद्धा यावर आपली मते व्यक्त केली आहे, असे आगलावे म्हणाले.
जिथे मंदिर आहे तिथे बौद्ध धर्मीय त्या मंदिराचे वारसदार आहेत. ते मंदिर परत आम्हाला मिळाले पाहिजे, असेही आगलावे म्हणतात. पण दुसरीकडे यासाठी न्यायालयात जाणार नसून हे सगळे इतरांना कळावे म्हणून मांडले, यात कुठलाही वाद उभा करायचा नाही, असेही आगलावे सांगतात.