नागपूर - राज्यातील सर्वात मोठे कोरोना हॉटस्पॉट म्हणून पुढे आलेल्या नागपुरात केवळ २२ दिवसांच्या कालावधीत तब्बल १ लाख रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट नागपूरकरांच्या जीवावर उठल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या नागपूर जिल्हात ३ लाख २ हजार कोरोनाबाधितांची नोंद आहे, त्यापैकी सुरुवातीचे एक लाख रुग्ण २३५ दिवसात बाधित झाले होते. तर एक लाख ते दोन रुग्ण होण्यासाठी १४४ दिवसांचा कालावधी लागला होता, मात्र त्यापुढील दोन ते तीन लाख रुग्णसंख्या केवळ २२ दिवसांमध्ये झाल्याने नागपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग किती वेगाने पासरतोय हे लक्षात येते. या उलट नागपुरातील आरोग्य व्यवस्था या परिस्थितीपुढे किती कुचकामी ठरलेली आहे. हे देखील या निमित्ताने पुढे आले आहे.
फेब्रुवारी महिन्यातच नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढायला सुरुवात झाली होती. त्यावेळी कोरोनाची दुसरी लाट इतकी भीषण असेल, असा अंदाज कुणालाही आला नव्हता. मात्र एप्रिल महिन्यात कोरोनाच्या या लाटेची सुनामी झालेली आहे हे देखील सत्य नाकारता येत नाही. यावर्षीतील जानेवारी महिन्यात १० कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात हा आकडा १५ हजारांच्या घरात गेला होता. मार्च महिन्यात तर ३२ हजार रुग्ण वाढले होते.
परिस्थिती अतिशय चिंताजनक
कोरोनामुळे राज्याची उपराजधानी संपूर्ण नागपुरात जिल्ह्यात उद्भवलेली भीषण परिस्थिती आता जीवघेणी ठरते आहे. दरदिवसाला पाच ते सात हजार नागरिक कोरोनाबाधित ठरत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आहेत. रुग्णांना साधादेखील बेड मिळत नसल्याने त्यांची फरफट सुरूच आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची सोय असलेल्या बेडसाठी वेटिंग सुरू आहे. या भीषण परिस्थितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. नवे पर्याय उपलब्ध करण्यासंदर्भात चिंतन सुरू असताना केवळ २२ दिवसात नागपूर जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या एक लाखाने वाढल्याचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत.
हेही वाचा : बघा VIDEO, वॉर्डबॉयने काढला ऑक्सिजन सिलिंडर, कोरोना रुग्णाचा तडफडून मृत्यू