नागपूर : संचारबंदी लावूनही बाजारातील वाढती गर्दी पाहता नागपुरात ऑड-इव्हन फॉर्म्युला अमलात आणण्याच्या सूचना मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी केल्या आहेत. यानुसार शहरातील 10 मनपा झोनपैकी पाच झोनमध्ये आदेश देऊन दुकाने खुली ठेवण्यास सगण्यात आले आहे.
गल्लीबोळातील परिसरात गर्दी
नागपूर शहरातील जुन्या बाजारपेठा आणि अरुंद रस्ते आजही तसेच आहे. यामुळे गल्लीबोळातील दुकाने असणाऱ्या परिसरात होणारी गर्दी चिंतेची बाब ठरत आहे. विशेष म्हणजे यात काही सुपर स्प्रेडर असल्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. यामुळे उत्तर आणि पूर्व दिशेने उघडली जाणारी दुकाने सम तारखेला तर दक्षिण व पश्चिम दिशेतील दुकाने विषम तारखेला सुरू ठेवण्याचा ऑड-इव्हन फार्म्युला ठरवून देत याविषयीच्या सूचना मानपाकडून देण्यात आलेल्या आहेत.
भाजीपाला मार्केट 8 पर्यंत सुरू
धंतोली झोनमध्ये भाजीपाला दुकाने पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत सुरू राहतील. तर आले, कांदे व्यापारी यांचे दुकान सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत सुरू राहतील. इतर दुकाने मात्र सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहतील. यासह सतरंजीपुरा, आसिनगर, मंगळवारी, धरमपेठ मध्ये ऑड-इव्हन तारखेप्रमाणे दुकाने सुरू राहतील. महात्मा फुले भाजी मार्केटमधील ओटेधारक आणि दुकानदार यांच्यात विभाजन करून दुकाने सुरू व बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.