नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना आज (मंगळवारी) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास नागपूर विमानतळावर घडली. उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड लक्षात आल्याने वैमानिकाने विमानाचे उड्डाण थांबवले. विमानात प्रवास करत असलेले गडकरींसह सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
इंडिगोच्या विमानाने गडकरी नागपूरवरुन दिल्लीला जायला निघाले. मात्र, उड्डाणापूर्वीच विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले . त्यानंतर त्याने धावपट्टीवरुन उड्डाणपूर्वीच विमान परत घेतले. यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. विमानाचे उड्डाण रद्द झाल्याने गडकरी नागपुरातील त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत.