नागपूर - मंगळवारी दिवसभरात नागपूर शहरात १४८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ५०५ इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रसासनाने आधीच इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सर्वाना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी 40 कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार ५८५ इतकी झाली आहे. याशिवाय मंगळवारी पुन्हा तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत नागपुरात एकूण ३८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे ३८ पैकी २४ मृत्यू हे नागपुर जिल्ह्यातील आहेत, तर १४ मृत्यू हे नागपूर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत. याशिवाय अमरावती आणि अकोला येथील कोरोनाबाधितांचे मृत्यू नागपूरमध्ये झालेले आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये होणारी एकूण मृत्युसंख्या ४० एवढी झालेली आहे. सध्या नागपुरातील ७ ठिकाणी ८८२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यापैकी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात(मेयो) ११५ तर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेडीकल)१४७, एम्समध्ये ५०, कामठी येथील मिलीटरी हॉस्पिटलमध्ये ३२ आणि खासगी रुग्णालयात २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १९२ आणि आमदार निवासमध्ये १९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६३.३२ टक्के इतके आहे, तर मृत्यू दर हा १.५१ इतका आहे.