नागपूर - नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पोलीस मुख्यालयातील अलंकार सभागृहात तक्रारकर्त्यांची गर्दी उसळली होती. यामध्ये कौटुंबिक वाद, शेजाऱ्यांसोबत क्षुल्लक कारणावरून असलेले मतभेद पासून तर गंभीर प्रकरणात पोलिसांनी कारवाईत केलेली दिरंगाई पर्यंतच्या तक्रारींचा पाढा नागरिकांकडून वाचण्यात आला. यावेळी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिला.
हेही वाचा - 10 वर्षांपासून अवैधरित्या नागपुरात राहणाऱ्या अफगाणी नागरिकाला परत पाठवणार - पोलीस आयुक्त
नागपूर शहरभरातून व्हॉट्सअॅप, इमेल आणि प्रत्यक्ष स्वरुपात १५८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ११५ नागरिकांनी प्रत्यक्ष स्वरुपात आपल्या तक्रारींची नोंद केली. महत्वाचे म्हणजे पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात नसलेल्या अधिक तक्रारींची यावेळी नोंद झाली होती. तर उर्वरित तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात हस्तांतरित केल्यानंतर त्यांची शहानिशा करून त्यावर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. तक्रार निवारण शिबिरात अशाही प्रकारच्या तक्रारी पुढे आल्या ज्यात पोलिसांनी तक्रारींवर लक्ष केंद्रित न करता दुर्लक्ष केले. त्यामुळे, नागरिकांना न्याय मिळू शकलेला नाही. मात्र, आज पोलीस आयुक्तांच्या समक्ष सुनावणी झाल्याने अशा वंचित लोकांमध्ये न्याय मिळण्याची अपेक्षा पुन्हा निर्माण झाली आहे.
अशा प्रकारच्या तक्रार निवारणाचे आयोजन होत राहील
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या संकल्पनेतून पोलीस तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकांमध्ये असलेली पोलिसांची नकारात्मक छवी सुधारण्यासाठी आणि त्यातून गुन्हे कमी करण्यासाठी मदत होईल म्हणून अशा प्रकारचे आयोजन महत्वाचे असतात. त्यामुळे, भविष्यात सुद्धा आणखी तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
हेही वाचा - नागपूरात दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या कार्यालयावर ईडीची कारवाई